धोका वाढला! चीन व पाकिस्तानकडे भारताहून अधिक अण्वस्त्रे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 03:32 AM2020-06-16T03:32:08+5:302020-06-16T06:42:19+5:30
एकूण अण्वस्त्रांपैकी ९० टक्के अण्वस्त्रे अमेरिका व रशियाकडे
स्टॉकहोम : जगातील एकूण अण्वस्त्रांपैकी ९० टक्के अण्वस्त्रे अमेरिका व रशियाकडे आहेत आणि पाकिस्तानकडेभारताहून जास्त व चीनकडेभारतापेक्षा दुपटीहून जास्त अण्वस्त्रे आहेत, असे जगातील अण्वस्त्रांची विश्वसनीय मोजणी करणाऱ्या येथील एका ख्यातनाम संस्थेने म्हटले आहे.
‘स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट’ने यासंबंधीचा ताजा अहवाल सोमवारी प्रसिद्ध केला. त्यानुसार या वर्षाच्या सुरुवातीला भारताकडे १५०, पाकिस्तानकडे १६०, तर चीनकडे ३२० अण्वस्त्रे होती.
अहवालानुसार जगातील एकूण नऊ अण्वस्त्रधारी देशांकडे मिळून सुमारे १३,४०० अण्वस्त्रे आहेत. त्यापैकी ९० टक्के अण्वस्त्रे अमेरिका (५,८००) व रशिया (६३७५) या दोन देशांकडे आहेत. गेल्या वर्षी या दोन देशांकडे मिळून १३,८६५ अण्वस्त्रे होती. प्रामुख्याने जुनी अण्वस्त्रे मोडीत काढल्याने या दोन्ही देशांच्या अण्वस्त्रांची संख्या कमी झाली आहे.
अहवाल असेही म्हणतो की, भारत व पाकिस्तानही त्यांच्या अण्वस्त्र दलात हळूहळू वाढ करीत आहेत व त्यांच्यात विविधता आणत आहेत. उत्तर कोरिया तर त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षा धोरणात अण्वस्त्रांना केंद्रस्थानी मानून त्यांचा विकास करीत आहे. जगातील अनेक देश स्वत:च्या सुरक्षेसाठी सातत्याने अण्वस्त्र निर्मिती करत आहेत.
कोणत्या देशाकडे किती अण्वस्त्रे?
इतर देशांपैकी फ्रान्सकडे २९०, ब्रिटनकडे २१५, इस्रायलकडे २९०, तर उत्तर कोरियाकडे ३० ते ४० अण्वस्त्रे असावीत, असे हा अहवाल म्हणतो. तुलनेने कमी अण्वस्त्रे असलेल्या देशांनी नवी अण्वस्त्रे तयार करण्याचा इरादा जाहीर केला आहे किंवा ते नवी अण्वस्त्रे तयार करीत आहेत. उदा. चीनने अण्वस्त्र दलाचे आधुनिकीकरण हाती घेतले असून, जमीन, आकाश व समुद्र अशा तिन्ही ठिकाणांहून अण्वस्त्रे डागण्याच्या क्षमतेचा समावेश आहे.