चीनचं भारताविरोधात कटकारस्थान, सीमेवर वसवली ६२४ गावं, सैनिक तैनात करणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 01:01 PM2024-05-29T13:01:49+5:302024-05-29T13:02:42+5:30
China India Conflict : चीनने भारतासोबतच्या विवादित सीमेवर गावे वसवली आहेत, असे एका रिपोर्टमधून समोर आले आहे.
नवी दिल्ली : चीन आणि भारत यांच्यातील सीमा विवाद अनेक वर्षांपासून सुरू आहे. या मुद्द्यावरून दोन्ही देशांच्या लष्करांमध्ये संघर्ष झाल्याचेही वृत्त आहे. दरम्यान, आता चीननेभारतासोबतच्या विवादित सीमेवर गावे वसवली आहेत, असे एका रिपोर्टमधून समोर आले आहे. वॉशिंग्टन थिंक टँक सेंटर फॉर इंटरनॅशनल अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज (CSIS) च्या रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे.
चीन हिमालयातील भारतासोबतच्या विवादित सीमेवरील शेकडो गावे वसवत असल्याचे १६ मे रोजी सीएसआयएसच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. न्यूजवीकच्या रिपोर्टमध्ये सॅटेलाइट फोटोंचा हवाला देण्यात आला आहे. यामध्ये २०२२ ते २०२४ च्या फोटोंची तुलना करण्यात आली. चीनने गेल्या ४ वर्षात ६२४ गावे बांधली आहेत.
सीएसआयएस अहवालात म्हटले आहे की, २०१८ ते २०२२ दरम्यान चीनने ६२४ गावे बांधली आहेत आणि त्यांचे काम सुरू आहे. अरुणाचल प्रदेशाजवळ ४ वेगवेगळ्या ठिकाणी ही गावे वसवली जात आहेत. अरुणाचल हा भारताचा भाग आहे, तर चीनकडून हा आपला भूभाग असल्याचा दावा करण्यात येतो. या वसवलेल्या गावांमध्ये गुप्तपणे सैनिक तैनात केले जाऊ शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
दरम्यान, भारत आणि चिनी सैनिकांमध्ये सीमा वादावरून संघर्ष होताना दिसतो. डिसेंबर २०२० मध्ये चीन आणि भारताच्या सैनिकांमध्ये संघर्ष झाला होता. तसेच, १९६२ मध्ये दोन्ही देशांमध्ये सीमेवरून युद्ध झाले होते. गेल्या ३ वर्षात चकमकीही पाहायला मिळाल्या आहेत. सीमावादावर कोणताही स्पष्ट तोडगा निघालेला नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
NEW: @jenniferJYjun and @BrianTHart use satellite imagery to analyze how China is upgrading villages along its disputed Indian border. They show these villages are often accompanied by military and dual-use infrastructure to bolster China’s capabilities. https://t.co/ppH1EEh0Fkpic.twitter.com/M2ByZtWzz6
— ChinaPower (@ChinaPowerCSIS) May 20, 2024
चीन बदलतोय डेमोग्राफी
सीमेजवळ वेगाने होत असलेला विकास चीनच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या क्षमतेचा दाखला आहे. गेल्या वर्षी याराओ जवळ नवीन रस्ता आणि दोन हेलिपॅडही बांधण्यात आले. तसेच, याराओ येथे ३९०० मीटर उंचीवर असलेल्या नवीन इमारती बांधण्यातही चीनला यश आल्याचे अहवालात म्हटले आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, तिबेटी आणि हान लोकसंख्येबाबत चीनही वेगळा दृष्टिकोन दाखवत आहे.