कोरोनानंतर चीनमध्ये उद्भवतोय 'हा' नवा आजार! मुलांमध्ये झपाट्याने पसरतोय, अनेक शाळा बंद, अलर्ट जारी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 08:30 AM2023-11-23T08:30:34+5:302023-11-23T08:31:28+5:30
चीनमधील बीजिंग आणि लिओनिंग येथील रुग्णालयात मोठ्या संख्येने मुलांना दाखल केले जात आहे.
बीजिंग : कोरोना महामारीनंतर आता चीनमध्ये एका नवीन आजाराने मोठ्या प्रमाणावर थैमान घातले आहे. चीनमधील अनेक शाळांमध्ये आणखी एक आजार वेगाने पसरत आहे. येथील शाळांमधील मुलांमध्ये न्यूमोनिया आजाराचा प्रादुर्भाव वाढत आहे. दरम्यान, ही चिंताजनक परिस्थिती कोरोना संकटाच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण करून देणारी आहे.
चीनमधील बीजिंग आणि लिओनिंग येथील रुग्णालयात मोठ्या संख्येने मुलांना दाखल केले जात आहे. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, या रहस्यमय न्यूमोनियाच्या आजारामुळे अनेक शाळा बंद आहेत. दरम्यान, न्यूमोनियाने बाधित झालेल्या मुलांमध्ये फुफ्फुसात सूज येणे आणि ताप येणे, यासह असामान्य लक्षणे दिसून येत आहेत. मात्र, खोकला, आरएसव्ही आणि श्वसन रोगांशी संबंधित इतर लक्षणे त्या मुलांमध्ये दिसत नाहीत.
ओपन-एक्सेस सर्व्हिलांस प्लॅटफॉर्म प्रोमेडने मंगळवारी विशेषत: लहान मुलांवर परिणाम होणाऱ्या निदान न झालेल्या न्यूमोनियाच्या उदयोन्मुख साथीच्या आजाराबद्दल चेतावणी दिली आहे. "हा उद्रेक नेमका केव्हा सुरू झाला हे स्पष्ट नाही, कारण इतक्या मुलांवर इतक्या लवकर परिणाम होणे असामान्य नाही", असे प्रोमेडने म्हटले आहे. याशिवाय, अहवालात असेही म्हटले आहे की, हा आजार एक महामारी आहे की नाही, यासंदर्भात अंदाज वर्तविणे घाईचे ठरेल. पण तरीही आपण सावधगिरी बाळगली पाहिजे.
दरम्यान, या नवीन उद्रेकामुळे रुग्णालयात मोठ्या प्रमाणात आजारी मुले आहेत, असे तैवानच्या आउटलेट एफटीव्ही न्यूजने वृत्त दिले आहे. तसेच, अधिकारी महामारी लपवत आहेत का? असा सवाल शाळेतील मुलांच्या पालकांनी उपस्थित केला आहे. परंतु नवीन उद्रेक मायकोप्लाझ्मा न्यूमोनियाशी संबंधित असू शकतो, ज्याला वॉकिंग न्यूमोनिया असेही म्हटले जाते, अशी शंका आहे, जी चीनमध्ये वाढत आहे.