चीनने रहस्यमय न्यूमोनियावर WHO ला दिलं उत्तर, सांगितलं मुलं आजारी पडण्यामागचं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 02:08 PM2023-11-24T14:08:54+5:302023-11-24T14:09:10+5:30
या आजाराच्या संसर्गाचा धोका किती मोठा याबाबतही केलं भाष्य
China WHO : चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने पसरलेल्या न्यूमोनियासारख्या गूढ आजाराने जगभरातील चिंतेत वाढ केली आहे. या आजाराचा झपाट्याने प्रसार होण्याची शक्यता आहे, त्यामुळे उत्तर चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर लहान मुले प्रभावित होत आहेत. चिनी रुग्णालयांमध्ये मुलांची झपाट्याने वाढणारी गर्दी पाहता जागतिक आरोग्य संघटनेने या मुद्द्यावर चीनकडून उत्तर मागितले होते. चीनने आता या प्रश्नाला उत्तर दिले आहे. चीनच्या अधिकाऱ्यांनी जागतिक आरोग्य संघटनेला सांगितले आहे की त्यांच्या देशात कोणत्याही नवीन आजाराची लक्षणे आढळून आलेली नाहीत.
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) चीनला अधिकृतपणे न्यूमोनियाच्या प्रकरणांमध्ये चिंताजनक वाढीची माहिती देण्यासाठी विनंती केली होती. यावर चिनी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, त्यांच्या देशात कोणताही असामान्य किंवा नवीन आजार आढळून आलेला नाही. डब्ल्यूएचओने सांगितले की चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या अधिकार्यांनी १३ नोव्हेंबर रोजी श्वसनाच्या आजारांमध्ये वाढ नोंदवली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार, आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते की, कोविड-19 चा सामना करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनशी संबंधित निर्बंध हटवण्यात आल्याने श्वसनाच्या आजारांची प्रकरणे वाढत आहेत. इतर देशांमध्ये देखील श्वासोच्छवासाच्या रोगांच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. यात श्वसन सिन्सिशिअल व्हायरस किंवा आरएसव्ही याचा समावेश आहे.
चिनी अधिकाऱ्यांनी दिली माहिती
डब्ल्यूएचओने सांगितले की त्यांनी विनंती केलेला डेटा प्रदान करण्यासाठी गुरुवारी चिनी आरोग्य अधिकार्यांची बैठक घेतली गेली. ऑक्टोबरपासून जिवाणू संसर्ग, आरएसव्ही, इन्फ्लूएंझा आणि सामान्य सर्दी विषाणू यासह विविध आजारांसाठी रुग्णालयात दाखल होणाऱ्या मुलांची संख्या वाढल्याचे आकडेवारीवरून दिसून आले आहे. चिनी अधिकार्यांनी सांगितले की त्यांच्या देशात कोणताही 'असामान्य किंवा नवीन रोग' उद्भवला नाही. यामुळे देशातील रुग्णालयांवर अतिरिक्त भार वाढलेला नाही.
दरम्यान, चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने बुधवारी सुचवले की सौम्य लक्षणे असलेल्या मुलांनी प्रथम प्राथमिक आरोग्य संस्था किंवा सामान्य रुग्णालयांच्या बालरोग विभागात जावे कारण मोठ्या रुग्णालयांमध्ये गर्दी असते आणि त्यांना बराच वेळ प्रतीक्षा करावी लागते. आरोग्य आयोगाने सांगितले की ते लहान मुलांमधील संसर्गजन्य रोगांच्या प्रकरणांवर बारीक लक्ष ठेवून आहेत.