एक कुटुंब एक मूल कायदा, तरीही चीनचा डोळा चुकवून १५ मुलांना जन्म!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2022 06:50 AM2022-05-02T06:50:25+5:302022-05-02T06:50:56+5:30
त्यांना चार मुले आणि ११ मुली आहेत. ही माहिती समजल्यावर अधिकाऱ्यांना केवळ फीटच यायची शिल्लक राहीली होती.
चीनमध्ये केव्हा काय घडेल याचा काहीच भरोसा नसतो. ते केव्हा, कोणते नियम बनवतील, ते जनतेच्या हिताचे आहेत की नाहीत, याचीही खात्री देता येत नाही. चीन सरकारने १९८० मध्ये असाच निर्णय एका झटक्यात घेतला आणि संपूर्ण देशात प्रत्येक कुटुंबासाठी ‘वन चाइल्ड’ पॉलिसी सुरू केली होती. तब्बल ३६ वर्षे हे धोरण अंमलात होते. आपल्या देशातील लोकसंख्या जगात सगळ्यात जास्त आहे आणि ती कमी झाली पाहिजे, एवढेच त्यावेळी त्यांच्या डोक्यात होते, पण भविष्यात त्याचे काय सामाजिक, आर्थिक परिणाम होतील, याचा काडीचाही विचार केला गेला नाही. त्याचे दुष्परिणाम आता ते भोगत आहेत. त्यामुळे २०१६ मध्ये ‘एक कुटुंब, एक मूल’ हे धोरण रद्द करण्यात आले. चीनचा खाक्या असा, की एकदा नियम केला, की कोणीही त्याविरुद्ध आवाज उठवायचा नाही. विरोध केला, तर थेट तुरुंग आणि सजा! अर्थात सक्ती केली, तरी ती मोडणारे काही महाभागही असतातच. तसेच ते चीनमध्येही होते, आहेत, पण हाताच्या बोटावर मोजता येतील इतके!
काही दिवसांपूर्वीचीच घटना. चीनमध्ये महिला आणि लहान मुलांची तस्करी होतेय, अशी शंका चीन सरकारला आली आणि त्यांनी १ मार्चपासून देशभर झडतीसत्र सुरू केले. त्यात एक अनोखी घटना उघडकीस आली. चीनमधील जिंगसू प्रांतातील एक मध्यमवयीन दाम्पत्य.. यातील नवऱ्याने कुत्र्याच्या गळ्यात घालावी, तशी साखळी बायकोच्या गळ्यात घातली होती आणि त्या अवस्थेतच तो तिला‘फिरवत’ होता, नंतर बांधून ठेवत होता.. का? - कारण ती मनोरुग्ण होती!.. पण सरकारच्या दृष्टीने याहून भयानक प्रकार म्हणजे या दाम्पत्याला आठ मुले आहेत! १९९८ मध्ये या दाम्पत्याने लग्न केले; त्यावेळी चीनमध्ये ‘एक कुटुंब, एक मूल’ हा कायदा अस्तित्वात होता!
सरकारसाठी हा प्रचंड मोठा धक्का होता! कायद्याचे उल्लंघन करून दाम्पत्याला एक नाही, दोन नाही, तब्बल आठ मुले व्हावीत, ही त्यांच्यासाठी शरमेची, लाजिरवाणी गोष्ट होती. त्यात इतकी वर्षे ही गोष्ट उघडकीसही येऊ नये म्हणजे सरकारी धोरणाचा हा सपशेल पराभव होता. सरकारने तातडीने चौकशी समिती नेमली आणि एका झटक्यात १७ वरिष्ठ अधिकाऱ्यांना बडतर्फ करून तुरुंगाचा रस्ता दाखवला! ही गोष्ट उजेडात आल्याबरोबर, चीन सरकारने मानवी तस्करीच्या शोधाबरोबरच आपला मोर्चा या गोष्टीकडेही वळवला आणि देशात अजूनही कोणी जोडपी आहेत का, ज्यांनी ‘एक मूल’ धोरणाचे उल्लंघन केले होते, त्याची खातरजमा करायला सुरुवात केली!
दोन-चार दिवसांतच आणखी एक धक्कादायक कहाणी समोर आली. दक्षिण चीनमधील गिझोऊ प्रांतात एक दाम्पत्य त्यांना आढळले. यातील नवऱ्याचे नाव आहे लिआंग आणि तो सध्या ७६ वर्षांचा आहे. त्याच्या बायकोचे नाव आहे लू होंगलान आणि ती ४६ वर्षांची आहे. त्यांना किती मुले असावीत? तब्बल १५. चार मुले आणि ११ मुली! ही घटना समजल्यावर अधिकाऱ्यांना फीट यायचीच बाकी होती. कारण या जोडप्यालाही मुले झाली, ती ‘एकच मूल’ हा कायदा अस्तित्वात असताना. १९९५ ते २०१६ या २१ वर्षांच्या कालावधीत १५ मुले त्यांनी जन्माला घातली!
लिआंग आणि लू हे दोघेही गुआंगडोंग येथे मजुरीचे काम करायचे. कामाच्या ठिकाणी १९९४ मध्ये दोघांची भेट झाली, दोघेही प्रेमात पडले आणि त्यांनी सोबत राहायचा निर्णय घेतला. पारंपरिक पद्धतीने त्यांनी लग्न केले, पण ते त्यांनी अजून रजिस्टर केलेले नाही, त्यामुळे ते कायदेशीर नाही. या घटनेने तर चीन सरकार अक्षरश: कानकोंडे झाले. आपल्याकडे एवढा कडक कायदा अस्तित्वात असतानाही लोक त्याचे उल्लंघन करतात, २५ वर्षांपेक्षाही जास्त काळ हा प्रकार सुरू राहतो आणि आपल्याला ते कळतही नाही, यामुळे सरकारच्या नाकाला फारच मिरच्या झोंबल्या. या प्रकरणातही त्यांनी ११ अधिकाऱ्यांना दोषी ठरवले असून ते आता तुरुंगात ‘खडी’ फोडत आहेत!
तरुण मुलीशी लग्न करणारा ‘मॅचो मॅन’
ज्या लिआंगने १५ मुले जन्माला घातली, तो २०१६ मध्येही प्रकाशझोतात आला होता, पण त्यावेळचे कारण वेगळे होते. आपल्यापेक्षा तीस वर्षांनी लहान असलेल्या महिलेशी त्याने विवाह केल्याच्या बातम्या आल्याने त्याला लोकांनीही ‘मॅचो मॅन’चा किताब दिला होता, पण त्याच्या मुलांची बातमी त्यावेळी फारशी बाहेर फुटली नव्हती! लिआंगची बायको लू हिने आपल्या बहुतांश मुलांना घरीच जन्म दिला आहे. आपल्याला एकच मूल आहे असे भासवून त्यांनी वर्षानुवर्षे सरकारी सवलतींचाही लाभ घेतला आहे. मजुरी करणाऱ्या या जोडप्याचे काय करायचे, हा प्रश्न आता सरकारपुढे उभा आहे.