Xi Jinping Illness: शी जिनपिंग यांना गंभीर आजार; व्यक्ती कोमात किंवा मृत्यूही होऊ शकतो, चालताही येत नव्हते
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 11:32 AM2022-05-11T11:32:28+5:302022-05-11T11:32:45+5:30
2019 मध्ये इटलीच्या भेटीदरम्यान चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांना चालताना खूप त्रास होत असल्याचे दिसून आले होते. यानंतर फ्रान्समध्येही त्यांना बसण्यासाठी आधाराची गरज होती.
चीनमध्ये कोरोनाने हाहाकार माजविलेला असताना झिरो कोविड पॉलिसीमुळे लाखो लोकांची उपासमार होऊ लागली आहे. चीनची दोन सर्वात मोठी शहरे बिजिंग आणि शांघायमध्ये कठोर लॉकडाऊन लागलेला आहे. लोकांना पकडून, जमिनीवर पाडून प्रसंगी फटके देऊन कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. अशातच चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याबाबत खळबळजनक बातमी आली आहे.
जिनपिंग यांना सेरेब्रल एन्यूरिज्म नावाचा गंभीर आजार झाला असून यामुळे त्यांना २०२१ च्या अखेरीस हॉस्पिटलमध्ये भरती व्हावे लागले होते, असा दावा करण्यात आला आहे. या आजारावर जिनपिंग यांनी ऑपरेशन करण्याचे टाळले असून चिनी औषधांवर भरवसा ठेवला आहे. जिनपिंग यांनी बराच काळ कोणत्याही परदेशी नेत्यासोबत चर्चा केलेली नाही, यामुळे त्यांच्या प्रकृतीबद्दल वृत्ते येऊ लागली होती.
यापूर्वी 2019 मध्ये इटलीच्या भेटीदरम्यान चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांना चालताना खूप त्रास होत असल्याचे दिसून आले होते. यानंतर फ्रान्समध्येही त्यांना बसण्यासाठी आधाराची गरज होती. 2020 मध्ये, चीनच्या शेनझेनमध्ये रॅलीदरम्यान जिनपिंग स्टेजवर उशिरा पोहोचले. एवढेच नाही तर त्यांनी सौम्य आवाजात भाषण केले होते. कोरोना महामारीमुळे चीनची अर्थव्यवस्था संकटात सापडली असताना जिनपिंग यांच्या आजारपणाची बातमी आली आहे.
काय आहे हा आजार...
सेरेब्रल एन्युरिझम हा मेंदूचा धोकादायक आजार आहे. हा आजार मेंदूच्या कोणत्याही भागात होऊ शकतो. हा रोग 50 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांना होऊ शकतो. यामुळे स्ट्रोक, कोमा किंवा मृत्यू देखील होऊ शकतो. उच्च रक्तदाब, कमकुवत नसा, संक्रमण, जखम आणि ट्यूमरचा संसर्ग झालेल्या लोकांना हा आजार होण्याची शक्यता असते.