आमच्या सीमेत भारतानेच घुसखोरी केली, हे आता स्पष्ट; व्ही. के. सिंह यांच्या विधानानंतर चीनचा दावा
By देवेश फडके | Published: February 9, 2021 11:50 AM2021-02-09T11:50:04+5:302021-02-09T11:53:00+5:30
केंद्रीय परिवहन राज्यमंत्री आणि माजी लष्कर प्रमुख व्ही. के. सिंह यांच्या एका वक्तव्यानंतर आता चीनने भारतावर निशाणा साधला आहे.
बीजिंग : केंद्रीय परिवहन राज्यमंत्री आणि माजी लष्कर प्रमुख व्ही. के. सिंह यांच्या एका वक्तव्यानंतर आता चीनने भारतावर निशाणा साधला आहे. चीनच्या तुलनेत भारताने अधिकवेळा प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे उल्लंघन केले, असे विधान व्ही. के. सिंह यांनी रविवारी केले होते. याच वक्तव्यावरून आता चीनने भारतावर टीका केली आहे. (china reacts on v k singh lac remark)
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन यांनी व्ही. के. सिंह यांच्या वक्तव्यवावर प्रतिक्रिया दिली. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. भारताने अनावधानाने का होईना, आपली चूक कबूल केली आहे. भारताकडून दीर्घकालावधीपासून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे उल्लंघन केले जात आहे. हे एक प्रकारे चीनच्या सीमेत अतिक्रमण केल्यासारखे आहे. यामुळे दोन्ही देशांमध्ये तणावाची स्थिती निर्माण होते. भारताची वागणूक हीच या प्रश्नाचे मूळ आहे. भारताने सीमेसंदर्भातील कराराचे कसोशिने पालन करावे, असे आवाहन चीनकडून करण्यात आले आहे.
सीरमने पुरवलेल्या कोरोना डोसचे लसीकरण दक्षिण आफ्रिकेने थांबवले; 'हे' दिले कारण
भारताने अधिकृतरित्या दिलेल्या माहितीपेक्षा व्ही. के. सिंह यांचे वक्तव्य एकदम वेगळे आहे. गतवर्षी लडाख येथील गलवान खोऱ्याजवळ भारत आणि चिनी सैनिकांमध्ये झडप झाली होती. यामध्ये भारताचे २० जवान शहीद झाले होते. चीनने याबाबत कोणतीही स्पष्ट भूमिका मांडली नाही. तेव्हा भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी भारताने कधीही प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे उल्लंघन केले नाही, असे म्हटले होते.
पूर्वी चिनी सैन्य भारतीय हद्दीत घुसून छावण्या बांधत होते आणि चर्चेनंतर त्या काही प्रमाणात मागे घेत होते. मात्र, वर्तमान सरकारने यावर ठोस निर्णय घेत यापुढे चीन असे करणार नाही, याची खबरदारी घेतली आहे. चीन आता दबावात आहे. आता काही चूक झाल्यास भारत जशास तसे उत्तर द्यायला समर्थ आहे, हे चीनला समजले आहे, असा दावा व्ही. के. सिंह यांनी रविवारी केला.
ग्लोबल टाइम्सच्या संपादकांनी ट्विट करत, भारत सरकारमधील मंत्री व्ही. के. सिंह जे पूर्वी भारतीय सैन्याचे प्रमुख होते, त्यांनी चुकून भारत-चीन सीमेवरील सत्य सर्वांसमोर मांडले आहे. भारताकडूनच सीमा बदलण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्याची उत्तरे चीनला द्यायला लागतात, असा दावा केला आहे.