चीन पाकिस्तानमध्ये लष्करी तळ बांधण्याच्या तयारीत- पेंटॅगॉन
By Admin | Published: June 7, 2017 03:07 PM2017-06-07T15:07:45+5:302017-06-07T15:07:45+5:30
अफ्रिकेतील जिबूतीमध्ये लष्करी तळ बांधल्यानंतर चीन आता पाकिस्तानमध्येही लष्करी तळ बांधण्याच्या तयारीमध्ये असल्याची माहिती पेंटॅगॉनने दिली आहे.
चीन पाकिस्तानमध्ये लष्करी तळ बांधण्याच्या तयारीत- पेंटॅगॉन
ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि 7- अफ्रिकेतील जिबूतीमध्ये लष्करी तळ बांधल्यानंतर चीन आता पाकिस्तानमध्येही लष्करी तळ बांधण्याच्या तयारीमध्ये असल्याची माहिती पेंटॅगॉनने दिली आहे. जिबूतीमध्ये अमेरिकेच्या लिमोनायर तळाजवळच चीननेही तळ उभा केला आहे, मात्र त्याचा कोणत्याही प्रकारचा धोका आपल्याला नसल्याचे अमेरिकन लष्कराने स्पष्ट केले आहे. आता मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या पाकिस्तानसारख्या देशामध्ये चीन लष्करी तळ उभा करण्याच्या तयारीमध्ये असे सांगत या तळांमुळे चीनच्या जहाजांची वाहतूकही तेथे वाढेल व या परिसरामध्ये चीनचा प्रभावही वाढीस लागेल अशी माहिती पेंटॅगॉनने दिली आहे. नव्या रेशिम मार्गाच्या नावाखाली चीनने अफ्रिका, युरोप आणि आशियामध्ये व्यापारी मार्गांचे जाळे विणायला याआधीच सुरुवात केली आहे. पाकिस्तान, अफगाणिस्तानसारख्या देशांनी त्याचे स्वागत केले असले तरी त्याला भारताने विरोध केला आहे. त्यातही लष्करी तळासारख्या घडामोडी आशियामध्ये होणार असतील तर भारताची डोकेदुखी नक्कीच वाढीस लागणार आहे.
समुद्री चाच्यांना टक्कर देण्यासाठी 2016 साली चीनने जिबूतीमध्ये नाविक तळाची बांधणी सुरु केली. या तळामुळे संयुक्त राष्ट्राच्या शांतता तुकड्यांना आणि इतर प्रकारची मदत करण्यात येईल असे चीनने स्पष्ट केले होते. पेंटॅगॉनने या वर्षी केलेल्या चीनच्या लष्करासंदर्भातील अहवालात यावर्षी चीनने मानवनिर्मित बेटांची केली नसल्याचे म्हटले आहे. मागील वर्षी मात्र चीनने मानवनिर्मित बेटांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती केल्याचे अहवालात नमूद केले होते. मागील वर्षीच्या अहवालात चीनने दक्षिण चीन समुद्रामध्ये 3200 एकर जागा भराव टाकून तयार केल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.