चीनने 'बेपत्ता' परराष्ट्रमंत्र्याला पदावरून हटवले, वांग यी यांच्याकडे दिली जबाबदारी!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 06:08 PM2023-07-25T18:08:44+5:302023-07-25T18:09:49+5:30
मंगळवारी माहिती देताना चीनच्या अधिकृत माध्यमांनी सांगितले की, चीनचे नवे परराष्ट्र मंत्री म्हणून वांग यी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
चीनमधील जगातील सर्वात मोठी कंपनी अलिबाबाचे संस्थापक जॅक मा हे काही वर्षे बेपत्ता झाले होते. यानंतर आता चीनचे परराष्ट्रमंत्री किन गांग गेल्या महिनाभरापासून बेपत्ता झाले आहेत. दरम्यान, जवळपास महिनाभरापासून बेपत्ता असलेल्या किन गांग यांना चीनने परराष्ट्रमंत्री पदावरून हटवले आहे. आता त्यांच्या जागी नव्या परराष्ट्रमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली आहे.
मंगळवारी माहिती देताना चीनच्या अधिकृत माध्यमांनी सांगितले की, चीनचे नवे परराष्ट्र मंत्री म्हणून वांग यी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर बेपत्ता किन गांग यांना परराष्ट्रमंत्री पदावरून हटवण्यात आले आहे. दरम्यान, अद्याप ५७ वर्षीय किन गांग यांच्याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. यासोबतच त्यांच्या जागी परराष्ट्र मंत्रालयाचे कामकाज कोण पाहत होते, याबाबत सुद्धा कोणतीही माहिती मिळालेली नाही.
किन गांग यांना २५ जून रोजी शेवटचे पाहिले गेले होते, जेव्हा ते एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावेळी कार्यक्रमात ते रशियन, श्रीलंकन आणि व्हिएतनाम अधिकार्यांसह बैठकांना उपस्थित होते. त्यानंतर ते सार्वजनिक ठिकाणी दिसले नाहीत. दरम्यान, किन गांग हे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे अत्यंत जवळचे मानले जातात. परराष्ट्रमंत्री आणि स्टेट काऊंसेलर पदावर असताना त्यांची प्रगती दुप्पट वेगाने झाल्याचेही म्हटले जात आहे. आता ते रहस्यमयी पद्धतीने गायब झाल्याने त्याचीही चर्चा जोरदार सुरु झाली आहे.
चीनच्या सरकारी मीडियाने शिन्हुआने नवीन घडामोडीबाबत सांगितले की, "चीनच्या सर्वोच्च विधिमंडळाने मंगळवारी एक विशेष सत्र बोलावले आणि वांग यी यांना नवीन परराष्ट्रमंत्री म्हणून नियुक्त करण्यासाठी मतदान केले." यापूर्वी, किन गांग यांच्या मंत्रालयाने यासंबंधी माहिती देताना सांगितले होते की, किन गांग हे आरोग्याच्या कारणांमुळे कामापासून दूर आहेत. मात्र त्यांच्या आजाराबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती.