मनुष्याला बर्ड फ्लू झाल्याची पहिली घटना चीनमध्ये, एकाला लागण; पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2021 06:28 AM2021-06-02T06:28:50+5:302021-06-02T06:29:24+5:30
आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, कोंबड्यातून मनुष्यात पसरणारा हा किरकोळ प्रकार आहे. यातून साथ पसरण्याचा धोका खूपच कमी आहे.
बीजिंग : मनुष्याला बर्ड फ्लू झाल्याची पहिली घटना चीनमध्ये समोर आली आहे. चीनच्या पूर्व प्रांतात जियांग्सुमध्ये ही घटना समोर आली आहे.
चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने मंगळवारी ही माहिती दिली. सरकारी सीजीएनटी टीव्हीने सांगितले की, झेनजियांग शहरात एका ४१ वर्षीय रुग्णात हा संसर्ग आढळून आला आहे.
त्याची प्रकृती स्थिर असून त्याला हॉस्पिटलमधून सुटी दिली जाऊ शकते. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, कोंबड्यातून मनुष्यात पसरणारा हा किरकोळ प्रकार आहे. यातून साथ पसरण्याचा धोका खूपच कमी आहे.
या रुग्णाला एच १० एन ३ या विषाणूचा संसर्ग झाल्याचे २८ मे रोजी स्पष्ट झाले होते. आयोगाने हे सांगितले नाही की, या व्यक्तीला संसर्ग कसा झाला. यापूर्वी जगात कोठेही मनुष्यात हा संसर्ग झाला नव्हता. चीनमध्ये बर्ड फ्लूचे विविध प्रकार आहेत. मनुष्यात संसर्ग होण्याचे प्रकारही कधी समोर येतात.
ग्वांगझूत लॉकडाऊन
चीनच्या दक्षिण भागात औद्योगिक शहर ग्वांगझूमध्ये कोरोनाचे ११ नवे रुग्ण आढळून आल्यानंतर लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. या शहराची लोकसंख्या १.५ कोटी एवढी आहे.