जगाला अंधारात ठेवून डोकलाममध्ये चीनकडून पुन्हा हालचाली, अमेरिकन अधिकाऱ्यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2018 06:13 PM2018-07-26T18:13:55+5:302018-07-26T18:15:05+5:30
चीनच्या सैन्याने डोकलामच्या पठारावर घुसखोरी करून रस्ता बांधण्यास सुरुवात केल्यानंतर भारत आणि चीनमध्ये तणाव निर्माण झाला होता.
वॉशिंग्टन - चीनच्या सैन्याने डोकलामच्या पठारावर घुसखोरी करून रस्ता बांधण्यास सुरुवात केल्यानंतर भारत आणि चीनमध्ये तणाव निर्माण झाला होता. अखेरीस 73 दिवसांच्या गतिरोधानंतर हा वाद निवळला होता. दरम्यान, चीनने डोकलाममध्ये पुन्हा हालचाली सुरू केल्या असून, आतापर्यंत भारत आणि भूतान यापैकी कुणीही त्यांना रोखलेले नाही, असा दावा अमेरिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केला आहे. तसेच दक्षिण चीन समुद्रात चीनकडून सुरू असलेल्या युद्धसरावाची तुलना या अधिकाऱ्याने हिमालयीन क्षेत्रात चीनकडून सुरू असलेल्या कुरापतींशी केली आहे.
अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रमुख उपसहाय्यक ( दक्षिण आणि मध्य आशिया) एलिस जी. वेल्स यांनी एका संसदीय सुनावणीदरम्यान सांगितले की, माझ्या मते भारत भक्कमपणए आपल्या उत्तर सीमेचे रक्षण करत आहे. अशा परिस्थितीत चीनच्या या हालचाली भारतासाठी चिंतेचा विषय आहे.महिला खासदार एन. व्हेनगर यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना वेल्स यांनी सांगितले की, भारत जर सामरिक दृष्ट्या स्थिर राहिला तर निश्चितपणे आम्ही भारतासोबत चांगली भागीदारी करू शकतो.
भारत आणि चीनमध्ये हिमालयीन भागातील सीमेवरून सातत्याने विवाद झालेले आहेत. गेल्या वर्षी भारत आणि चीनमध्ये डोकलामच्या पठारावर विवाद झाला होता. चीनने या पठारावर रस्ता बांधण्याचा घाट घातल्याने वादाला तोंड फुटले होते. अखेर 73 दिवसांच्या गतिरोधानंतर हा वाद संपुष्टात आला होता.