संशयास्पद लोक ओळखण्यास चीनचे रोबो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2016 04:15 AM2016-10-03T04:15:41+5:302016-10-03T04:15:41+5:30
आंगडोंग प्रांतातील तीन बंदरांमध्ये संशयास्पद लोकांचा शोध घेऊन तसा इशारा देणारे दहा बुद्धिमान रोबो (यंत्रमानव) तैनात केले
बीजिंग : चीनने आपल्या दक्षिण गुआंगडोंग प्रांतातील तीन बंदरांमध्ये संशयास्पद लोकांचा शोध घेऊन तसा इशारा देणारे दहा बुद्धिमान रोबो (यंत्रमानव) तैनात केले आहेत. विमानतळावर अशा रोबोट्सचा सुरक्षेसाठी वापर झाल्यानंतर कस्टम्स अधिकारी म्हणून हे रोबो काम करतील.
बंदरांवर चीनच्या कस्टम्स विभागाने प्रथमच असे बुद्धीमान रोबो वापरले असून ही दहा जणांची त्यांची पहिली तुकडी आहे. शिओ हाय या नावाचा हा रोबो अतिशय आधुनिक असून तो ऐकू, बोलू शकतो. तो शिकू शकतो, बघू शकतो व चालूही शकतो, असे चीनची अधिकृत वृत्तसंस्था शिन्हुआने म्हटले. हा रोबो कँटोनीज, मँडारीन, इंग्लिश आणि जपानी भाषेसह २८ भाषा आणि स्थानिक भाषांमध्ये उत्तर देऊ शकतो. त्यासाठी विशेष कस्टम्स डाटाबेस वापरण्यात आला आहे. चेहरा ओळखण्याच्या तंत्रज्ञानामुळे हे रोबो संशयास्पद माणसे ओळखून सावधगिरीचा इशाराही देतील, असे गोंगबेई कस्टम्सचे संचालक झाओ मिन यांनी सांगितले. गुआंगडोंग प्रांतातील शेनझेन या सगळ््यात जास्त गर्दीच्या विमानतळावर गेल्या महिन्यात चीनने सुरक्षेसाठी रोबोची पहिल्यांदाच नियुक्ती केली होती. ‘द अन्बोट’ या नावाच्या सुरक्षा रोबोने डिपार्चर हॉलमध्ये २४ तास सुरक्षेचे काम केले. निर्यात घसरल्यामुळे चीन सध्या आर्थिक अडचणींना तोंड देत आहे. त्या पार्श्वभूमीवर चीन स्वस्तातल्या वस्तु उत्पादनातून दूर होण्यासाठी उच्च तंत्रज्ञानात फार मोठी गुंतवणूक करीत आहे. (वृत्तसंस्था)