‘त्या’ प्रकरणी भारत आणि पाकिस्तानने चर्चा करावी; चीनने दिला संयमाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 08:41 AM2022-03-15T08:41:16+5:302022-03-15T08:42:29+5:30

चुकून पाकिस्तानात गेलेल्या क्षेपणास्त्राप्रकरणी दोन्ही देशांनी चर्चा करावी, असे आवाहन चीनने केले आहे.

china said india pakistan should hold talks conduct probe into accidental missile firing | ‘त्या’ प्रकरणी भारत आणि पाकिस्तानने चर्चा करावी; चीनने दिला संयमाचा सल्ला

‘त्या’ प्रकरणी भारत आणि पाकिस्तानने चर्चा करावी; चीनने दिला संयमाचा सल्ला

googlenewsNext

बीजिंग: तांत्रिक कारणांमुळे भारताचे क्षेपणास्त्र पाकिस्तानात जाऊन पडल्याच्या घटनेमुळे आता नवीन वाद निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. यासंदर्भात भारताने उच्च स्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan), सुरक्षा सल्लागार मोईद युसूफ आणि परराष्ट्र मंत्रालयातसह अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. यातच आता चीनकडूनही प्रतिक्रिया आली आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात भारताकडून चुकून पडलेल्या क्षेपणास्त्राप्रकरणी दोन्ही देशांनी शक्य तितक्य लवकर चर्चा करावी आणि मार्ग काढावा. तसेच भारताने तपास सुरू करावा, असे मत चीनकडून व्यक्त करण्यात आले आहे. 

चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना या प्रकरणी भाष्य केले आहे. भारत आणि पाकिस्तान हे दक्षिण आशियातील महत्त्वाचे देश आहेत. क्षेत्रीय सुरक्षा आणि स्थैर्य राखण्याची दोन्ही देशांची जबाबदारी आहे. चुकून डागल्या गेलेल्या क्षेपणास्त्राप्रकरणी दोन्ही देशांनी चर्चा करावी. यातून मार्ग काढावा, असे आवाहन आम्ही करू इच्छितो, असे लिजियन यांनी म्हटले आहे. 

पाकिस्तानच्या माजी राजदूतांनी व्यक्त केली भीती 

माजी राजदूत असलेल्या अब्दुल बासित यांनी या घटनेचा संबंध जम्मू-काश्मीरशी जोडला आहे. बासित यांनी आपल्या युट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ शेअर करत या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. सदर घटना समस्याकारक आहे. २२ फेब्रुवारी १९९४ रोजी भारताच्या संसदेत एक प्रस्ताव मंजूर केला होता, यामध्ये आझाद जम्मू-काश्मीरला परत घ्यायचे आहे, असे म्हटले होते. आता रशियाने युक्रेनवर कारवाई करत दोनेत्स्क आणि लुहांस्क या दोन प्रांतांना स्वतंत्र घोषित केले आहे. त्यामुळे आता भारताला यातून प्रेरणा मिळाली असू शकते, असे बासित यांनी सांगितले. आझाद जम्मू-काश्मीरवर हल्ला करून तो भूभाग परत घेण्याची शक्यता अधिक वाढली आहे. या सर्व गोष्टी समोर आल्या पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

पाकिस्तानने गाफील राहू नये

भारताच्या नरेंद्र मोदी सरकारची वृत्ती पाहता या घटनेनंतर आता पाकिस्तानने गाफील न राहता सतर्क, सावध राहण्याची आवश्यकता आहे. यासंदर्भात पाकिस्तान आणि भारताने एक करार करायला हवा, असे बासित यांनी सांगितले. पाकिस्तान त्यांच्या परीक्षणावेळी आगाऊ सूचना देत असतो. मात्र, भारत या कृतीतून पाकिस्तानची भूमिका आजमावून पाहत आहे. याचे कारण भारत शीतयुद्ध सुरू करू पाहत आहे. यासाठी पाकिस्तान फौजांनी सावध राहण्याची गरज असल्याचे बासित म्हणाले. 

दरम्यान, ०९ मार्च २०२२ रोजी भारताने आमच्या हवाई सीमेचे उल्लंघन केले असून, एक सुपरसॉनिक ऑब्जेक्ट पाकिस्तानात पडले. यामुळे पाकिस्तानमधील अनेक इमारतींचे नुकसान झाले असून, यात जीवितहानी होऊ शकली असती, असे पाकिस्तानच्या निवेदनात म्हटले आहे. यावर, नियमित तपासणी करताना झालेल्या तांत्रिक चुकीमुळे एक क्षेपणास्त्र डागले गेले आणि ते पाकिस्तानात जाऊ पडले, असे स्पष्टीकरण भारताने दिले आहे.
 

Web Title: china said india pakistan should hold talks conduct probe into accidental missile firing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.