चीन म्हणतो, चंद्र आमचा, मंगळही आमचाच; ‘त्रिकुटा’ची नजर पृथ्वीच्या पलीकडे! 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 08:05 AM2023-03-30T08:05:25+5:302023-03-30T08:08:12+5:30

समुद्राच्या या भूभागावर आमचाच मालकी हक्क असल्यानं दुसऱ्यांनी तिथे येऊन लुडबूड करू नये, असं सांगत त्यांची मनमानी त्यांनी सुरू केली आहे.

China says, the moon is ours, Mars is also ours! | चीन म्हणतो, चंद्र आमचा, मंगळही आमचाच; ‘त्रिकुटा’ची नजर पृथ्वीच्या पलीकडे! 

चीन म्हणतो, चंद्र आमचा, मंगळही आमचाच; ‘त्रिकुटा’ची नजर पृथ्वीच्या पलीकडे! 

googlenewsNext

चीनचा इतिहास आहे, त्यांनी जिथे जिथे आपलं पाऊल ठेवलं, कालांतरानं तो प्रदेश आमचाच, आम्हीच त्याचे ‘मालक’ आणि सर्वेसर्वा आहोत, असा दावा त्यांनी ठोकला आणि तशी दंडेलशाही सुरू केली. मग तो भारत-चीन सीमेलगतचा भारतीय प्रदेश असो, तैवान असो किंवा आणखी काही. हा भूभाग आमचाच आहे, असं सांगत आजवर अनेक ठिकाणी त्यांनी दुसऱ्याच्या प्रदेशावर कब्जा केला आहे. 

‘साऊथ चायना सी’बाबतही त्यांनी हेच केलं आहे. समुद्राच्या या भूभागावर आमचाच मालकी हक्क असल्यानं दुसऱ्यांनी तिथे येऊन लुडबूड करू नये, असं सांगत त्यांची मनमानी त्यांनी सुरू केली आहे. त्यामुळे जगातील अनेक देश चिंतेत आहेत. त्याबाबत त्यांनी चीनला स्पष्टपणे खडसावलंही आहे, पण बऱ्या बोलानं मानणाऱ्यातला चीन नाही. आपल्याकडे असलेल्या विज्ञान-तंत्रज्ञान आणि अणुशक्तीच्या बळावर आपण काहीही करू शकतो, इतरांना नमवू शकतो, असा अहंगंड त्यांना आहे. अमेरिका आणि इतर देशांच्या हद्दीत त्यांनी सोडलेले ‘स्पाय बलून’ हादेखील त्याचाच एक भाग आहे.

चीनला कोणीही थोडा विरोध केला तरी लगेच हा देश दमदाटीची आणि युद्धाची भाषा करायला लागतो. मात्र चीनची दादागिरी आता फक्त जमीन आणि समुद्रापुरती मर्यादित राहिलेली नाही. अवकाशातही आपले पाय आणि बस्तान बसवायला त्यांनी सुरुवात केली आहे. अंतराळात सर्वात आधी पाेहोचून, मंगळासारख्या ठिकाणीही ‘ही आमचीच जागा, बऱ्या बोलानं इथून सर्वांनी बाहेर व्हा, नाहीतर तुम्हाला बघून घेऊ, तुमचा नायनाट करू’ अशा धमक्या द्यायला आणि त्या प्रत्यक्षात उतरवायला ते कमी करणार नाहीत, अशी सध्या स्थिती आहे. चीन असं करू शकतो, अशी भीती सगळ्या जगालाच जाणवते आहे. फ्लोरिडाचे सिनेटर, माजी अंतराळवीर आणि ‘नासा’चे प्रमुख बिल नेल्सन यांनाही हीच भीती सतावते आहे. त्याबाबत तर एका जाहीर मुलाखतीत त्यांनी जगालाच सतर्क केलं आहे. 

बिल नेल्सन म्हणतात, चीन आणि अमेरिका यांच्यात अंतराळात स्पर्धा सुरू आहे, हे तर खरंच आहे, पण आम्हाला मुख्य भीती याची वाटते की, चीननं जर अमेरिकेच्या आधी चंद्र, मंगळ इत्यादी ग्रहांवर आपलं बस्तान बसवून हातपाय पसरले, तर तो झपाट्यानं तिथल्या सर्वच संसाधन संपन्न भूभागावर आपला कब्जा करेल. नंतर चीन कोणालाही तिथे येऊ देणार नाही. या ग्रहांवरची जमीनही आमचीच, असा दावा ते ठोकतील. इतकंच नाही तर या ग्रहांवर पोहोचण्याचे इतर देशांचे आणि अंतराळवीरांचे मार्गही बंद करतील. एकदा का त्यांनी या आणि त्यानंतर इतरही ग्रहांवर आपला कब्जा केला, तर मग त्यांना तिथून हटवणंही उर्वरित जगासाठी आणखी मुश्कील होऊन जाईल. ‘चंद्र, मंगळाचा इलाका आमचाच’, असं सांगत सगळ्या ठिकाणी चीन आपला कडक पहारा बसवेल. 

‘सायन्टिफिक रिसर्च’च्या नावाखाली चंद्र, मंगळ आणि इतरही ग्रहांवर चीन आपला कब्जा करेल, ही केवळ शक्यता नाही, तर चीन खरोखर तसंच करेल, याची आम्हाला खात्री आहे, असं सांगताना बिल नेल्सन यांनी जगालाही या धोक्याची स्पष्ट कल्पना दिली आहे. त्यांचं म्हणणं आहे, चीननं इतर ग्रहांवर आणि एकूण अंतराळावरच आपला कब्जा करू नये, यासाठी अमेरिका प्रयत्नशील आहेच, पण बाकी जगानंही त्यासाठी पुढाकार घ्यायला हवा आणि अमेरिकेच्या बरोबरीनं या मोहिमेत सहभागी व्हायला हवं.

जगातला कोणताही देश या क्षेत्रात आपल्यापेक्षा पुढे जाऊ नये, यासाठी चीन गेल्या काही वर्षांपासून सर्वतोपरी प्रयत्न करतो आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून आपल्या ‘स्पेस प्रोग्राम’ अंतर्गत चीननं गेल्या वर्षीच अंतराळात आपलं स्वतंत्र स्पेस स्टेशन उभारलं आहे. ‘आर्टेमिस मिशन’ अंतर्गत नासाही अंतराळात बरंच काम करतं आहे. त्याद्वारे चंद्र आणि मंगळाबाबत अधिकाधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न नासा करते आहे. मंगळ ग्रहावरील माती, तिथलं वातावरण आणि इतर गोष्टी समजून घेण्यासाठी नासानं काही रोबोटिक रोव्हर्सही मंगळावर पाठवले आहेत.

‘त्रिकुटा’ची नजर पृथ्वीच्या पलीकडे! 

भविष्यात पृथ्वीपलीकडेही आपली हडेलहप्पी सुरू राहावी, यासाठी चीनच्या शी जिनपिंग सरकारनं पाण्यासारखा पैसा ओतायला सुरुवात केली आहे. तिथेही आपली ताकद वाढावी, यासाठी चीन आपलं सर्वस्व पणाला लावत आहे.  अर्थात अमेरिकाही त्यात मागे नाही. या दोन्ही देशांच्या जोडीला रशियादेखील पृथ्वीच्या पलीकडे नजर लावून बसला आहे. हायपरसॉनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज राहण्याचा चंगच या देशांनी बांधला आहे.

Web Title: China says, the moon is ours, Mars is also ours!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.