तैवानमधील मानवाधिकार कार्यकर्त्यास चीनमधील न्यायालयाने ठोठावला तुरुंगवास
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2017 03:42 PM2017-11-28T15:42:17+5:302017-11-28T15:44:29+5:30
तैपेई- तैवानमधील मानवाधिकार कार्यकर्त्यांस सरकार उलथवण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्याखाली चीनमधील न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. तैवानी व्यक्तीला चीनच्या न्यायालयाने अशा गुन्ह्याखाली दंडीत करण्याची ही पहिलीच वेळ आहे. चीनमधील राज्यव्यवस्थेवर प्रहार करणारे लेख, व्हीडिओ, पुस्तके प्रसारित करुन पाश्चिमात्य पद्धतीची क्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न केला असा आरोप मानवाधिकार कार्यकर्ते ली मिंग-चेह यांच्यावर ठेवण्यात आला. त्यानंतर हुनान प्रांतातील युएयांग न्यायालयाने त्यांना तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली.
JUST IN: Chinese court jails Taiwanese democracy activist Lee Ming-cheh for 5 years for 'subversion' https://t.co/CXABxsBm7U#china#taiwanpic.twitter.com/O2DqorF0ZH
— Tom Grundy (@tomgrundy) November 28, 2017
ली बरोबर पेंग युहुआ या चीनमधील नागरिकावरही असेच आरोप ठेवण्यात आले होते. पेंग युहुआला सात वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. पेंगने, चीनमध्ये बहुपक्षीय पद्धती अस्तित्वात यावी यासाठी पाम फ्लॉवर ही संघटना स्थापन केल्याचे आणि आपल्याबरोबर ली काम करत असल्याचे सांगितले.
ली मिंग-चेह याला न्यायालय़ाने शिक्षा ठोठावल्य़ानंतर त्याची पत्नी ली चिंग-यू हिला हॉटेलच्या खोलीतून बाहेर पडू देण्यात आले नसून तिला कोणाशीही भेटण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तिने ली मिंगच्या समर्थकांबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. ली मिंगच्या कामगिरीबद्दल आपल्याला अभिमान आहे, धोका असूनही त्याने जोखीम पत्करुन काम केले अशा शब्दांमध्ये त्याच्या पत्नीने आपले मत लोकांना व माध्यमांना कळवले आहे. तैवानला चीन आपलाच एक भाग समजत आला आहे. तसेच चीन तैवानच्या नागरिकांवर मानसिकदृष्ट्या दबाव आणण्याचा प्रयत्न नेहमीच करत आला आहे. आज झालेली शिक्षा ही त्याचाच एक प्रकार असल्याचे सांगण्यात येत आहे. ली मिंग चेह तैवानच्या लोकशाहीकरणाबाबत ऑनलाइन व्याख्याने देत असे त्याचप्रमाणे चीनमधील राजकीय कैद्यांसाठी त्याने निधीही गोळा केला होता.