लॉकडाऊनमधून बाहेर पडला अन् आर्थिक संकटात अडकला; शांघाईच्या अडचणी काही कमी होईना, कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 06:37 PM2022-05-27T18:37:58+5:302022-05-27T18:38:14+5:30
Shanghai lockdown : चीनची आर्थिक राजधानी म्हटल्या जाणाऱ्या शांघाई शहरातील आर्थिक संकट दिवसेंदिवस वाढत आहे. आर्थिक उत्पादनाच्या बाबतीत, शांघाईला एप्रिलच्या सुरुवातीपासून लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे.
कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगाला लॉकडाऊनचा सामना करावा लागला. लॉकडाऊनमुळे सर्वत्र आर्थिक कोंडी झालेली पाहायला मिळाली. प्रत्येक देशाच्या आर्थिक रचनेवर वाईट परिणाम झाला. छोटे-मोठे देश कोरोनाच्या विळख्यात सापडले. विकसित देशांपैकी एक असलेल्या चीनलाही आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. विशेषत: लॉकडाऊनमुळे चीनमधील शांघाई शहराला मोठा फटका बसला आहे.
चीनची आर्थिक राजधानी म्हटल्या जाणाऱ्या शांघाई शहरातील आर्थिक संकट दिवसेंदिवस वाढत आहे. आर्थिक उत्पादनाच्या बाबतीत, शांघाईला एप्रिलच्या सुरुवातीपासून लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे. कोरोना प्रकरणांमध्ये घट होत असल्याने शांघाई शहरातील लॉकडाऊन 1 जूनपासून रद्द करण्यात येणार आहे. शहरातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, ज्युनिअर आणि सीनियर हायस्कूलमधील विद्यार्थी 6 जूनपासून ऑफलाइन वर्गांसाठी शाळेत परत येऊ शकतात.
शांघाईसमोर आर्थिक संकट
शॉपिंग मॉल्स आणि डिपार्टमेंटल स्टोअर्स उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशा परिस्थितीत लवकरच शांघाई शहरात आर्थिक घडामोडी तीव्र होतील आणि लोक पुन्हा आनंदी जीवन जगू शकतील अशी अपेक्षा आहे. बीजिंगचे अधिकारी प्रीमियर ली केकियांग यांनी बुधवारी जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेबाबत एक गंभीर बाब सांगितली. ते म्हणाले की 2020 च्या तुलनेत यावेळी काही बाबींमध्ये अडचणी अधिक होत्या. खासगी क्षेत्रातील अनेक अर्थतज्ञांना एप्रिल-जूनमध्ये जीडीपी एका वर्षापूर्वीच्या तिमाहीच्या 4.8 टक्के वाढीवरून कमी होण्याची अपेक्षा आहे.
देशांतर्गत हवाई वाहतुकीवरही झाला परिणाम
कोरोनामुळे लॉकडाऊनमुळे देशांतर्गत हवाई वाहतुकीवरही मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. अर्थ मंत्रालयाने सांगितले की ते 21 मे ते 20 जुलै या कालावधीत चीनी विमान कंपन्यांना सबसिडी देऊ करणार आहेत. यामुळे कोरोनामुळे निर्माण झालेली मंदी आणि तेलाच्या चढ्या किमतींचा सामना करण्यासाठी विमान कंपन्यांना मदत होईल. शांघाई आणि आसपासच्या परिसरात लॉकडाऊनमुळे देशांतर्गत हवाई वाहतूक कमी झाली आहे. शांघाईस्थित चायना इस्टर्नने सांगितले की एप्रिल 2021 मध्ये प्रवाशांची संख्या 90.7 टक्क्यांनी कमी झाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.