चीनच्या लुलियांग प्रांतात इमारतीला भीषण आग, 26 जणांचा होरपळून मृत्यू, बचावकार्य सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 01:38 PM2023-11-16T13:38:44+5:302023-11-16T13:39:28+5:30
ही घटना आज सकाळी 6.50 च्या सुमारास घडली.
चीनच्या शांक्सी प्रांतातील लुलियांग येथील कोळसा कंपनीच्या इमारतीला लागलेल्या आगीत 26 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना आज (16 नोव्हेंबर) सकाळी 6.50 च्या सुमारास घडली. या घटनेनंतर आतापर्यंत 63 जणांना इमारतीतून बाहेर काढण्यात आले असून त्यापैकी 51 जणांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
चीनच्या स्थानिक सरकारी मीडिया सीसीटीव्हीच्या वृत्तानुसार, शांक्सी प्रांतातील लुलियांग शहरातील लिशी जिल्ह्यातील योंगजू कोल कंपनीच्या चार मजली इमारतीमध्ये आग लागली. स्थानिक वेळेनुसार सकाळी 6.50 च्या सुमारास ही आग लागली. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. तसेच, आगीचे कारण तपासले जात आहे. इमारतीला लागलेल्या आगीत 26 जणांचा मृत्यू झाला आहे. तर इमारतीतून एकूण 63 लोकांना बाहेर काढण्यात आले असून, त्यापैकी 51 जणांना उपचारासाठी लुलियांग फर्स्ट पीपल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, सरकारी माध्यमांनी वृत्त दिले आहे की, चीनमध्ये ढिलाई सुरक्षा मानके आणि खराब अंमलबजावणीमुळे व्यावसायिक अपघात सामान्य आहेत. या वर्षी जुलै महिन्यात देशाच्या उत्तर-पूर्व भागात शाळेच्या जिमचे छत कोसळून 11 जणांचा मृत्यू झाला होता. त्याच्या एक महिना आधी उत्तर-पश्चिम चीनमधील बार्बेक्यू रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 31 जणांचा मृत्यू झाला होता.
चीनच्या इतिहासातील सर्वात मोठी दुर्घटना
चीनमध्ये वारंवार आगीच्या घटना घडल्यानंतर सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यासाठी देशव्यापी मोहीमही सुरू करण्यात आली होती. या वर्षी एप्रिल महिन्यात बीजिंगमधील रुग्णालयात लागलेल्या आगीत 29 लोकांचा मृत्यू झाला आणि इतर लोकांना जीव वाचवण्यासाठी खिडक्यांमधून उडी मारावी लागली होती. इतिहासातील सर्वात मोठी दुर्घटना 2015 मध्ये चीनमधील तिआनजिन येथे घडली होती, जेव्हा रसायनाच्या गोदामात झालेल्या स्फोटामुळे 165 लोकांचा मृत्यू झाला होता.