चीनने अरुणाचलप्रदेशवर हल्ला करावा; खलिस्तानी दहशतवादी पन्नूने भारताविरोधात गरळ ओकली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 09:57 AM2024-10-11T09:57:26+5:302024-10-11T09:58:22+5:30
कॅनडाचे उप परराष्ट्र मंत्री डेविड मॉरिसन यांनी भारत हा एक देश आहे. त्यांच्या संप्रभुतेचा सन्मान केला जावा, असे म्हटले होते. याविरोधात पन्नूने एक व्हिडीओ जारी केला आहे.
खलिस्तानी दहशतवादी पन्नूने भारतातील राज्यांना वेगळे करण्यासाठी मोहिमा सुरु करण्याचा इशारा दिला आहे. तसेच चीननेअरुणाचल प्रदेशावर हल्ला करण्याची वेळ आली आहे, असेही वक्तव्य केले आहे. कॅनडाच्या मंत्र्यांनी भारताच्या अखंडतेवर वक्तव्य केल्याने पन्नू खवळला आहे. यातून त्याने आता खलिस्तानी कारस्थानांना चीनचा पाठिंबा मिळतो का हे पाहण्यास सुरुवात केली आहे.
कॅनडाचे उप परराष्ट्र मंत्री डेविड मॉरिसन यांनी भारत हा एक देश आहे. त्यांच्या संप्रभुतेचा सन्मान केला जावा, असे म्हटले होते. याविरोधात पन्नूने एक व्हिडीओ जारी केला आहे. यामध्ये त्याने शीख फॉर जस्टीसचे मिशन २०२४ सांगितले आहे. वन इंडियाला २०४७ पर्यंत नो इंडिया करायचे असल्याचे त्याने म्हटले आहे.
पन्नूची खलिस्तानी संघटना पंजाबला स्वतंत्र बनविण्याची कारस्थाने रचत आहे. यासाठी ते प्रचारही करत असतात. परंतू पंजाबमध्ये याला किती पाठिंबा मिळतो ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आता पन्नूने जम्मू-काश्मीर, आसाम, मनिपूर आणि नागालँडला स्वातंत्र्य मिळविण्यासाठई आंदोलन करण्याच्या मोहिमा आखण्याचा इशारा दिला आहे.
पन्नूने शी जिनपिंग यांना उद्देशून आता चीनी सैन्याला अरुणाचल प्रदेश परत मिळविण्यासाठी हल्ला करण्याचे आदेश द्या, अशी मागणी केली आहे. अरुणाचल प्रदेश हा चीनचाच भाग असल्याच्या चीनच्या दाव्याला त्याने पाठिंबा दर्शविला आहे.
तसेच एसजेएफ हे कॅनडा आणि अमेरिकेच्या कायद्यांचा वापर भारत तोडण्यासाठी करत राहणार असल्याचे पन्नू म्हणाला. तसेच २०४७ पर्यंत भारताची सीमा पुन्हा एकदा आखली जाईल, भारत जगाच्या नकाशावरून गायब होईल अशी धमकी पन्नूने दिली आहे.