मोठा खुलासा! ब्रिटनमध्ये चीन विणतंय गुप्तहेरांचं जाळं, २०० शिक्षकांवर संशय; चौकशी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2021 07:39 PM2021-02-09T19:39:47+5:302021-02-09T19:45:34+5:30
China spying Britain : शिक्षणाच्या आडून संपूर्ण ब्रिटनमध्ये आपले गुप्तहेर पाठवण्याचा चीनचा मनसुबा
शेजारील देश असो किंवा मग विकसीत देश चीन आपल्या कुरापती काही थांबवताना दिसत नाही. भारताविरुद्ध आक्रमक भूमिका आणि अमेरिकेशी वैर घेतल्यानंतर आता चीनचे ऑस्ट्रेलियासोबतचेही संबंध बिघडले आहेत. चीनच्या छुप्या कुरापतींचं आणखी एक धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. चीनकडून ब्रिटनमध्ये हेरगिरीसाठी गुप्तहेरांचं जाळं विणलं जात असल्याची माहिती उघड झाली आहे. (China spying Britain : 200 British universities academics under radar)
शिक्षणाच्या आडून चीन संपूर्ण ब्रिटनमध्ये आपले गुप्तहेर पाठवण्याचा मनसुबा आहे. चीनच्या या घातकी इराद्याची भांडाफोड झाली आहे. ब्रिटनमधील २० हून अधिक विद्यापीठांमधले जवळपास २०० हून अधिक शिक्षक हे चीनसाठी हेरगिरी करत असल्याच्या संशयाच्या भोवऱ्यात आहेत.
अफगाणिस्तान सरकारने याआधी दहशतवाद्यांशी हातमिळवणी करुन काम करणाऱ्या चीनच्या काही नागरिकांना पकडलं होतं. याबाबत चीन सरकारला चक्क माफी देखील मागावी लागली होती आणि चीनचे राष्ट्रपती क्षी जिनपिंग यांनी प्रकरण मिटवलं होतं. पण यावेळी जिनपिंग यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. ब्रिटनमधील या संशयित शिक्षकांवरील आरोप जर सिद्ध झाले तर शिक्षकांना तुरुंगाची हवा खावी लागू शकते. ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणेकडून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जात आहे.
१० वर्षांपर्यंत होऊ शकतो तुरुंगवास
संशयात भोवऱ्यात असलेल्या शिक्षकांनी जाणून बुजून किंवा नकळत देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोहोचेल अशी काही पावलं उचलली आहेत का याची सखोर चौकशी ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणेकडून केली जात आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या कायद्याचं उल्लंघन केलं गेलं असेल तर या शिक्षकांवर कमीत कमी १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
चीनच्या आव्हानांचा थेट मुकाबला करणार- बायडेन
ब्रिटनच्या शिक्षकांवर नेमका आरोप काय?
ब्रिटनच्या खतरनाक शस्त्रास्त्रांची महत्वाची माहिती शिक्षकांनी चीनला पुरवल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. देशाच्या सुरक्षेसंदर्भातील संवेदनशील माहिती शत्रु देशापर्यंत पोहोचणार नाही यासाठी ब्रिटनने निर्यात नियंत्रण कायदा लागू केला. पण ब्रिटनच्या शिक्षकांनी एअरक्राफ्ट, मिसाइलचं डिझाइन आणि सायबर हत्यारांसंदर्भातील महत्वाची माहिती चीनला देऊन या कायद्याचं उल्लंघन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
"विद्यार्थ्यांना जिनपिंग यांच्या विचारांचे धडे द्या," चीनमधील शाळांना अजब आदेश
ऑक्सफर्ड विद्यापीठावरही ठपका
ब्रिटनच्या सुप्रसिद्ध ऑक्सफर्ड विद्यापीठावरही याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या विद्यापीठाला चीनस्थित एका कंपनीकडून ७ लाख पाऊंडची देणगी मिळाली आहे. या देणगीची चौकशी केली जात आहे. देणगीच्या मोबदल्यात विद्यापीठानं १२० वर्ष जुन्या प्रतिष्ठित प्रोफेसरशिप ऑफ फिजिक्सचं नाव बदलण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. याचा संबंध थेट चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या गुप्तचर शाखेशी असल्याचं बोललं जात आहे.