China Bullet Train Tibet: चीनची नवी खेळी! भारतीय सीमेजवळ तिबेटमध्ये बुलेट ट्रेनची सेवा सुरु; तणाव वाढणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 04:29 PM2021-06-25T16:29:39+5:302021-06-25T16:31:55+5:30
China Bullet Train Tibet: चीनने थेट तिबेटमध्ये पोहोचण्याऱ्या एका बुलेट ट्रेनची सेवा सुरू केली आहे.
बीजिंग: भारत आणि चीनमधील तणाव कमी होताना दिसत नाही. लडाख सीमेसंदर्भात दोन्ही देशांमध्ये अनेक चर्चा होऊनही ठोस तोडगा अद्यापही निघालेला नाही. अशातच आता चीनने थेट तिबेटमध्ये पोहोचण्याऱ्या एका बुलेट ट्रेनची सेवा सुरू केली आहे. यामुळे पुन्हा एकदा दोन्ही देशांमधील तणाव वाढण्याची चिन्हे असल्याचे सांगितले जात आहे. (china started first bullet train in tibet close to indian lac border in tibet)
चीनने भारतीय सीमेजवळ असलेल्या तिबेट भागातील हिमालयाच्या क्षेत्रात संपूर्णपणे इलेक्ट्रिफिकेशन असलेली बुलेट ट्रेनची सेवा सुरू केली आहे. प्रांतीय राजधानी लहासा आणि नियंगची हे भाग या बुलेट ट्रेनने जोडले जाणार असून, नियंगची हा भाग अरुणाचल प्रदेशच्या जवळ असल्याचे सांगितले जात आहे.
४८ तासांचा प्रवास १३ तासांवर
सिचुआन-तिबेट रेल्वेअंतर्गत येणाऱ्या लहासा-नियंगची या मार्गावर ४३५.५ किमी दरम्यान ही पहिली बुलेट ट्रेन सेवा सुरू करण्यात आली आहे. सत्तारुढ पक्ष सीपीसीच्या शताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने या मार्गावरील बुलेट ट्रेन प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले होते. या सेवेमुळे ४८ तासांचा प्रवास १३ तासांवर येणार आहे. नियंगडमधील मेडोग हा प्रांत अरुणाचल प्रदेशच्या सीमेच्या अत्यंत जवळ असल्याचे सांगितले जात आहे.
भारत जमीन बळकावत असल्याच्या चीनच्या उलट्या बोंबा
दरम्यान, भारताचे परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी कतार इकोनॉमिक फोरममध्ये दिलेल्या भाषणावरुन चीनचा थयथयाट झाला आहे. जयशंकर यांनी खडेबोल सुनावल्यानंतर चीनला चांगलीच मिरची झोंबली असून भारत एक 'अतिक्रमणकारी' देश असल्याचा बेछुट आरोप चीनने केला आहे. सीमा वादावर आम्हाला शांतीपूर्ण पद्धतीने तोडगा काढायचा आहे. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध सीमावादावरुन तोडणे योग्य ठरणार नाही. चर्चा हाच या वादावरचा पर्याय असल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता झाओ लिजियान यांनी म्हटले आहे. कतार इकोनॉमिक फोरमला संबोधित करताना भारताचे परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी भारत-चीन द्विपक्षीय संबंधांसमोर अनेक आव्हाने निर्माण झाल्याचे म्हटले होते. सीमेवर चीनकडून मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात करणे आणि सैन्य कमी करण्यासाठी सहकार्य न करणे, असे आरोप जयशंकर यांनी केले होते.