Corona Vaccine : कोरोना लशीसंदर्भात भारताचा 'जय-जयकार', चीनला अजीर्ण; सुरू केलं असं कटकारस्थान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2021 09:43 AM2021-01-25T09:43:09+5:302021-01-25T09:49:50+5:30
ग्लोबल टाइम्सने भारताच्या व्हॅक्सीन मैत्रीविरोधात अपप्रचाराला सुरुवात केली आहे. ग्लोबल टाइम्सने सीरम इंस्टिट्यूटमध्ये आगीची घटना घडल्यानंतर भारताच्या व्हॅक्सीन मॅन्युफॅक्चरिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एवढेच नाही, तर...
नवी दिल्ली -भारताच्या व्हॅक्सीन डिप्लोमसीने चीनला अजीर्ण झाले आहे. कोरोना महामारीत भारताच्या व्हॅक्सीन मैत्री अभियानाने चीनला दक्षिण आशियात बॅकफुटवर ढकलले आहे. यामुळे आता चीनचे सरकारी मुखपत्र ग्लोबल टाइम्सने (Global Times) भारताच्या या अभियानाविरोधात अपप्रचार करायला सुरुवात केली आहे. तर, भारताने आधीच श्रीलंका, अफगानिस्तान आणि पाकिस्तान वगळता सर्व सार्क देशांना भारताच्या सीरम इंस्टिट्यूटची (SII) कोविशिल्ड (Covishield) लस गिफ्ट केली आहे.
अफगाणिस्तानला लवकरच पाठवली जाणार लस -
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात लशीसंदर्भात चर्चा सुरू आहे. अफगाणिस्तानातील रेग्युलेटरकडून लशीच्या वापराला परवानगी मिळल्यानंतर त्यांना लस सप्लाय करण्यात येईल, असे भारताने म्हटले आहे. एवढेच नाही, तर अफगाणिस्तान आपल्या प्राधान्य क्रमात वर असल्याचा विश्वासही भारताने दिला आहे. भारताकडून श्रीलंकेला 27 जानेवारीला कोरोना लशीचे 5 लाख डोस देण्यात येणार आहेत.
भारताच्या व्हॅक्सीन मॅन्युफॅक्चरिंगवर उपस्थित केला सवाल -
ग्लोबल टाइम्सने भारताच्या व्हॅक्सीन मैत्रीविरोधात अपप्रचाराला सुरुवात केली आहे. ग्लोबल टाइम्सने सीरम इंस्टिट्यूटमध्ये आगीची घटना घडल्यानंतर भारताच्या व्हॅक्सीन मॅन्युफॅक्चरिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एवढेच नाही, तर चीनमध्ये राहणारे भारतीय चिनी लशीलाच अधिक प्राधान्य देत आहे, असा दावाही ग्लोबल टाइम्सने केला आहे. तसेच बीबीसीच्या वृत्ताचा हवाला देत, पेशन्ट्स राइट्स ग्रुप ऑल इंडिया ड्रग अॅक्शन नेटवर्कचे म्हणणे आहे, की सीरमने कोविशील्डसंदर्भात ब्रिजिंग स्टडी पूर्ण केलेली नाही, असेही ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे.
नेपाळमध्ये चिनी लशीला परवानगी नाही -
ज्या देशांत राजकीय आणि आर्थिक दृष्ट्या हात-पाय परसण्याची आणि त्यांच्यावर आपला प्रभाव निर्माण करण्याची चीनची मनिषा आहे, अशा देशांना चीनने लस देण्याचा प्रस्ताव दिला आहे. नेपाळमध्ये ड्रग रेग्युलेटरने अद्याप चिनी लशीला मंजुरी दिलेली नाही. तसेच, मालदीव सरकारच्या सूत्रांनीही म्हटले आहे, की चीनकडून कोविड 19 लशीच्या कुठल्याही प्रकारच्या सप्लायसंदर्भात कुठल्याही प्रकारचे संकेत मिळालेले नाही. महत्वाचे म्हणजे, चीन शेजारील देश कंबोडियानेदेखील भारताकडे लस पुरविण्याचा आग्रह केला आहे. तसचे गेल्या आठवड्यातील रॉयटरच्या एका वृत्तानुसार, लशीच्या पुरवठ्यासंदर्भात बांगलादेश आणि चीनदरम्यान एकमत नाही.
अनेक देशांना भारताच्या लशीत रस -
गेल्या आठवड्यातच भारताने म्हटले होते, की अनेक देशांना आपल्या लशीत रस आहे. आपण व्हॅक्सीन मॅन्युफॅक्चरिंगचे हब आहोत. एवढेच नाही, तर सरकारने असेही म्हटले आहे, की भारत भागिदार देशांना टप्प्याटप्प्याने लशीचा पुरवठा सुरूच ठेवेल. भारताकडून सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, मोरक्को, बांगलादेश आणि म्यानमारला लशीचा पुरवठा करण्यात येत आहे.