फक्त एका तासात 1000 किमी...बुलेट ट्रेनपेक्षा तिप्पट वेग, चीन बनवतोय सुपरसॉनिक ट्रेन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 02:52 PM2023-12-29T14:52:04+5:302023-12-29T14:52:47+5:30
China SuperSonic Train: चीनच्या शांसी प्रांतात या सुपरसॉनिक ट्रेनची यशस्वी चाचणीदेखील झाली आहे.
China SuperSonic Train: भारतात 'वंदे भारत' आणि 'अमृत भारत'सारख्या वेगवान ट्रेन सुरू झाल्या आहेत. पण, आपला शेजारील देश चीन सुपरसॉनिक ट्रेन तयार करतोय. ही ट्रेन ताशी 1000 किलोमीटर वेगाने धावू शकते. चीनने याची चाचणीदेखील यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. या ट्रेनला 'अल्ट्रा हाय-स्पीड मॅग्नेटिक लेव्हिटेशन' (मॅगलेव्ह) ट्रेन म्हटले जात आहे. ही ट्रेन एका लांब पाइपलाइनच्या आत चालवली जाईल.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, चायना एरोस्पेस सायन्स अँड इंडस्ट्री कॉर्पोरेशन लिमिटेड (CASIC) ने या मॅगलेव्ह ट्रेनची चाचणी शांसी येथील चाचणी क्षेत्रात केली. येथे दोन किलोमीटर लांबीच्या पाइपलाइनमध्ये व्हॅक्यूम तयार करून ट्रेन चालवण्यात आली. भविष्यात हांगझोऊ आणि शांघाय, या दोन शहरादरम्यान ही ट्रेन सुरू करण्याची योजना आहे.
उत्तर चीनमधील शांसी प्रांतातील दातोंग शहरात या ट्रेनसाठी सुपरकंडक्टिंग मॅगलेव्ह चाचणी लाइन तयार करण्यात आली आहे. CASIC शास्त्रज्ञ ली पिंग म्हणाले की, सध्या या ट्रेनच्या प्राथमिक चाचण्या सुरू आहेत. ट्रेनची रचना, वेग, नेव्हिगेशन आदींची चाचणी झाली. बहुतांश चाचण्यांमध्ये यश आले आहे. सर्व चाचण्या झाल्यानंतर हांगझोऊ आणि शांघाय दरम्यान ट्रेन सुरू केली जाईल.
सध्या 623 किलोमीटर प्रतितास या वेगाने चाचणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, व्हॅक्यूम निर्माण न करता ही गती प्राप्त झाली आहे. व्हॅक्यूम तयार केल्यानंतर ट्रेनचा वेग ताशी 1000 किलोमीटर होईल. सध्या चीनमध्ये धावणाऱ्या हायस्पीड बुलेट ट्रेनचा कमाल वेग ताशी 350 किलोमीटर आहे.