चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 05:05 PM2024-09-20T17:05:38+5:302024-09-20T17:36:01+5:30
गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानात विविध प्रकल्पांवर काम करत असलेल्या चिनी नागरिकांवर हल्ले होत आहेत. यामुळे पाकिस्तानवर चीनने दबाव टाकला होता.
इस्लामाबाद : चीनने पार भारताच्या पलिकडे पाऊल टाकत पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करण्याची तयारी सुरु केली आहे. पाकिस्तान आणि चीन संयुक्त सुरक्षा दलाची स्थापना करण्याची तयारी करत आहेत. यासाठी करार केला जाणार असून याद्वारे पाकिस्तानमध्ये चिनी सैनिकांच्या तैनातीचा रस्ता मोकळा होणार आहे. महत्वाचे म्हणजे भारताला याचा धोका आहे.
गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानात विविध प्रकल्पांवर काम करत असलेल्या चिनी नागरिकांवर हल्ले होत आहेत. यामुळे पाकिस्तानवर चीनने दबाव टाकला होता. आता चिनी सैन्य पाकिस्तानात या नागरिकांची सुरक्षा करणार आहे. चिनी नागरिकांवर पाकिस्तानविरोधी टोळ्यांनी हल्ले केले होते. यामुळे चीन गुंतवणूक करत असलेले प्रकल्प धोक्यात आले होते.
पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करण्यावरून तज्ञांना वेगळीच शंका येत आहे. पाकिस्तानमधून चीन भारताला घेण्याचा कट रचत आहे. भारताचा भाग असलेल्या पीओके, गिलगिट बाल्टिस्तानसह अनेक भागांत चीन सैन्यासाठी मुलभूत यंत्रणा उभी करत आहे.
यापूर्वीही चीनने आपले सैन्य तैनात करण्याचा प्रस्ताव मांडला होता. मात्र त्यानंतर पाकिस्तानने चीनच्या प्रस्तावाला विरोध दर्शवला होता.
नव्या करारानंतर चिनी नागरिकांची चिलखती वाहनांतून वाहतूक होणार आहे. असेच हल्ले होत राहिले तर चीनने भविष्यातील गुंतवणुकीवरून पाकिस्तानला धमक्या देण्यास सुरुवात केली होती. हजारो चीनी नागरिक देखील पाकिस्तानमध्ये CPEC आणि इतर अनेक प्रकल्पांवर काम करत आहेत. त्यांच्या सुरक्षेच्या आडून चीन भारताविरोधात मोठे कट रचत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
पाकिस्तान चिनी सैनिकांच्या तैनातीला विरोध करत असला तरी दहशतवाद्यांनीच पाकिस्तानला नमते घेण्यास भाग पाडले आहे. तेहरीक-ए-लब्बैक ही संघटना तेथील सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच बलुचिस्तान लिबरेशन आर्मी दक्षिण-पश्चिम बलुचिस्तानमध्ये आपली सत्ता प्रस्थापित करत आहे. ग्वादर बंदर हे बलुचिस्तानमध्येच आहे, जे ६० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किमतीच्या चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (CPEC) साठी महत्त्वाचे ठिकाण आहे.