कोरोना लसीची किंमत लपवतोय चीन; नेपाळनं किंमत जाहीर केल्यानंतर 'ड्रॅगन' खवळला!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 04:12 PM2021-06-20T16:12:49+5:302021-06-20T16:13:16+5:30
नेपाळप्रती नेहमी पोकळ सहानुभूती दाखवणारा चीन सध्या नेपाळला चढ्या दरानं कोरोना विरोधी लसीची विक्री तर करतोच आहे.
नेपाळप्रती नेहमी पोकळ सहानुभूती दाखवणारा चीन सध्या नेपाळला चढ्या दरानं कोरोना विरोधी लसीची विक्री तर करतोच आहे. पण चीनी कोरोना लसीची किंमत जाहीर केल्यामुळे नेपाळवर चीननं संताप देखील व्यक्त केला आहे. नेपाळनं जेव्हा चीनमध्ये उत्पादन झालेल्या कोरोना लसीची किंमत जाहीर करण्याचा प्रयत्न केला तेव्हा चीनचा तिळपापड झाला आहे. नेपाळनं काही स्थानिक मीडियाच्या माध्यमातून सिनोफार्म लस खरेदीचं मूल्य जाहीर केलं. ज्यानुसार या लसीच्या एका डोसची किंमत १० डॉलर म्हणजेच जवळपास ७४१ रुपये इतकी सांगण्यात येत आहे. नेपाळ सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेविरोधात लढण्यासाठी चीनसोबत याच दरानं लस खरेदीचा व्यवहार करण्याची योजना आखत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार कोरोनाचा कहर वाढत असताना नेपाळच्या नवनिर्वाचित ओली सरकारनं आपल्या नव्या मित्रासोबत म्हणजेच चीनसोबत कोरोना लसीचे ४० लाख डोस खरेदीचा करार केला आहे. पण सिनोफार्म कंपनीनं यासाठी लसीची किंमत जाहीर करायची नाही, अशी अट नेपाळसमोर ठेवली होती. नेपाळ सरकारनं लसीची खरेदी किंमत आणि डिलिव्हरीची तारीख जाहीर करायची नाही अशा सूचना कंपनीकडून देण्यात आल्या होत्या. तरीही माध्यमांमध्ये लसीबाबतची माहिती पोहोचल्यानं चीनचा तिळपापड झाला आहे.
काठमांडू पोस्टनं प्रकाशित केलेल्या एका लेखामधून सिनोफार्म लसीची किंमतीची माहिती समोर आली आहे. यातील माहितीनुसार चीन नेपाळ सरकारला कोरोना लसीच्या गुप्त व्यवहाराच्या करारावर स्वाक्षरी केल्याशिवाय मदत करायला तयार नव्हता. काठमांडू पोस्टनं नेपाळ सरकारमधील दोन मंत्री आणि दोन सरकारी अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं चीनी लसीची किंमतीची माहिती प्रकाशित केली आहे. संबंधित दोनही मंत्री कॅबिनेट बैठकीत उपस्थित होते. त्याचवेळी लसीच्या कराराबाबतच्या चर्चेतून लसीची किमतीची माहिती समोर आली आहे.
सिनोफार्म कंपनीनं अद्याप करार अस्तित्वात न आल्यानं लसीची अंतिम किंमत निश्चित केलेली नाही. पण अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार सिनोफार्म लसीच्या एका डोसची किंमत ७४१ रुपये इतकी असण्याची शक्यता आहे. म्हणजेच लसीचे दोन डोस घेण्यासाठी एका व्यक्तीला १४८२ रुपये इतका खर्च येणार आहे. विशेष म्हणजे भारतानं नेपाळला चीनपेक्षा कमी दरात लस पुरवठा केलेला आहे.