चीन-अमेरिकेमध्ये हातमिळवणी! दोन्ही देशांमध्ये 250 अब्ज डॉलर्सचे करार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2017 05:41 PM2017-11-09T17:41:44+5:302017-11-09T17:44:16+5:30
दक्षिण चीन समुद्रावरुन चीन आणि अमेरिकेमध्ये तीव्र स्वरुपाचे मतभेद आहेत. चीनची दक्षिण चीन सागरातील दादागिरी अमेरिकेला अजिबात मान्य नाही.
बिजींग - दक्षिण चीन समुद्रावरुन चीन आणि अमेरिकेमध्ये तीव्र स्वरुपाचे मतभेद आहेत. चीनची दक्षिण चीन सागरातील दादागिरी अमेरिकेला अजिबात मान्य नाही. पण असे असूनही दोन्ही देशांमध्ये अत्यंत महत्वाचे करार झाले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच चीनचा दौरा केला. या दौ-यात दोन्ही देशांमध्ये 250 अब्ज डॉलरच्या करारांवर स्वाक्षरी करण्यात आली.
यात बोईंग विमान खरेदी करण्यापासून अलास्कामध्ये संयुक्तपणे द्रवरुप नैसर्गिक गॅस निर्मितीचाही करार करण्यात आला. ग्रेट हॉल ऑफ द पीपलमध्ये उद्योजकांच्या संमलेनाला मार्गदर्शन करताना चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी या करारांची माहिती दिली. चीन आणि अमेरिकेमध्ये आर्थिक आणि व्यावसायिक सहकार्य पुढे नेण्याची प्रचंड क्षमता आहे.
परस्परांचे स्पर्धक बनण्यापेक्षा चीन आणि अमेरिका एकमेकांना पूरक ठरु शकतात असे शी जिनपिंग म्हणाले. अमेरिकेकडून ऊर्जा आणि शेती उत्पादनांची आयात वाढवण्याची आमची इच्छा आहे. नागरी तंत्रज्ञानाचे प्रोडक्टही आम्हाला अमेरिकेकडून मिळतील अशी अपेक्षा आहे. अमेरिकेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी चिनी कंपन्यांना आम्ही सतत प्रोत्साहन देत राहू. बेल्ट आणि रोड प्रकल्पात अमेरिकन कंपन्या आणि वित्तीय संस्थांचे आम्ही स्वागत करु असे जिनपिंग म्हणाले.