चीनचा फुगा; अमेरिकेची हवा! संघर्षाचे नजरेत आलेले दोन पैलू जास्त चिंताजनक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2023 09:01 AM2023-02-19T09:01:22+5:302023-02-19T09:01:43+5:30
चीनने सोडलेला फुगा आणि त्याला अमेरिकेने दिलेले प्रत्युत्तर हे हिमनगाचे टोक आहे. परिणामी भविष्यात अशा प्रकारच्या संघर्षात वाढ होण्याची शक्यता असून, जागतिक स्थिरतेचा फुगा कधीही फुटू शकतो.
डॉ. रोहन चौधरी,
आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक
अमेरिकी संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांच्या गेल्या वर्षीच्या तैवान भेटीवरून अमेरिका-चीन यांच्यात ताणलेले संबंध सुधारण्याच्या हेतूने अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकेन यांनी चीनचा दौरा आयोजित केला होता. परंतु, नेमके त्याच वेळेस अमेरिकेच्या आकाशात दिसलेला चिनी फुगा आणि अमेरिकेने तो पाडण्याची केलेली कृती यावरून ब्लिंकेन यांचा दौरा रद्द तर झालाच, परंतु यानिमित्ताने जागतिक संघर्षाचे नजरेत आलेले दोन पैलू जास्त चिंताजनक आहेत.
पहिला पैलू हा अमेरिका आणि चीन या दोन बड्या राष्ट्रांतील अविश्वासाचा आहे. फुग्याद्वारे चीन आपल्यावर हेरगिरी करत असल्याच्या संशयावरून खास लढाऊ विमानाद्वारे अमेरिकेकडून तो फुगा पाडण्यात आला. दुसरीकडे वातावरणाविषयी संशोधनाच्या हेतूने तो फुगा सोडला असून, तो भरकटला असे स्पष्टीकरण चीनने दिले. बायडेन अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर चीन-अमेरिका यांच्यात संवाद सुरळीत होऊन त्याद्वारे विश्वासाचा सेतू निर्माण होईल अशी अपेक्षा होती. परंतु, कोणत्याही मार्गाचा वापर करून आपला प्रभाव अबाधित राखण्याचा प्रयत्न करणारी अमेरिका आणि कोणत्याही थराला जाऊन त्या प्रभावाला आव्हान देणारा चीन यामुळे जागतिक शांतता ही कमालीची संवेदनशील बनली आहे. त्यातही कोणतीही जागतिक संस्था अथवा कोणताही देश निर्णायक हस्तक्षेप करू शकत नसल्यामुळे छोट्याशा ठिणगीवरून संघर्षाचा भडका उडू शकतो.
दुसरा पैलू हा संघर्षाच्या बदलत्या स्वरूपाचा आहे. पारंपरिकदृष्ट्या युद्धे ही सीमेवर लढली जायची. त्यामुळे अशा युद्धाविषयी अंदाज बांधणे शक्य होते. परंतु, तंत्रज्ञानाच्या उपलब्धतेमुळे आणि समाजमाध्यमांच्या प्रभावामुळे अवघे जग युद्धभूमी बनले आहे. चीनने सोडलेला फुगा हा या युद्धाचा भाग असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. जमीन, समुद्र याचबरोबर अवकाशाचे महत्त्व वाढले आहे. यापूर्वीही चंद्रावर उतरवल्या जाणाऱ्या रॉकेटच्या लँडिंग जागेवरून या दोन्ही देशांमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे. नासाने आपले रॉकेट स्थापन करण्यासाठी चंद्रावर ज्या जागेची निवड केली आहे तिथेच आपले रॉकेटदेखील उतरवण्याची चीनची योजना आहे. यासारख्या अंतराळ मोहिमांबाबत चर्चा करण्यासाठी चीन आणि अमेरिका यांच्यात ‘अमेरिका-चीन सिव्हिल स्पेस डायलॉग’ ही समिती स्थापन करण्यात आली आहे. परंतु, २०१७ नंतर या समितीची बैठक झालेली नाही. दुसरीकडे वातावरणातील बदलामुळे उपग्रहाचे महत्त्वदेखील वाढले त्यावरूनही भविष्यात संघर्ष होण्याची शक्यता आहे. थोडक्यात, भारत-चीन यांचा सीमेवरून सुरू असलेला पारंपरिक संघर्ष, दहशतवादी संघटनांकडून सुरू असलेले अपारंपरिक युद्ध आणि चीन-अमेरिका यांच्यात अंतराळावरून असणारा संघर्ष असे संघर्षाचे प्रकार असून, कोणत्याही प्रकारचा संघर्ष जागतिक शांततेचा फुगा सहजपणे फोडू शकतो.
तंत्रज्ञानाने मानवी जग कितीही सुकर केले असले तरी त्याच्या राजकीय वापरामुळे संघर्ष हे स्वस्त झाले आहेत. १९४५ ते १९९१ मधील सोव्हिएत महासंघ आणि अमेरिका यांच्यातील शीतयुद्धात शस्त्रास्त्र स्पर्धा कितीही तीव्र असली तरी त्या दोघांत करारारूपी संवाद चालू होता. १९६२ साली ‘क्युबन मिसाईल संकट’ म्हणून प्रसिद्ध असलेली घटना घडली होती. यावरून दोन्ही देशांत अणुयुद्धाचा भडका उडण्याची शक्यता होती. परंतु, दोन्ही देशांकडून सामंजस्याने हा वाद मिटविण्यात आला. अशा प्रकारचा संवादाचा सध्याच्या जागतिक व्यवस्थेत संपूर्णतः अभाव आहे. देशांतर्गत तणाव इतका वाढला आहे की कोणतेच देश माघार घेण्याची शक्यता कमी आहे. रशिया हे सध्याचे ज्वलंत उदाहरण आहे.