तीन लाख सैनिकांची चीन कपात करणार
By admin | Published: September 3, 2015 10:18 PM2015-09-03T22:18:13+5:302015-09-04T01:16:01+5:30
२.३ दशलक्ष सैनिकांपैकी तीन लाख सैनिकांची कपात करण्याची घोषणा चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनिपिंग यांनी गुरुवारी केली. द्वितीय महायुद्धात जपानविरुद्ध मिळविलेल्या
बीजिंग : २.३ दशलक्ष सैनिकांपैकी तीन लाख सैनिकांची कपात करण्याची घोषणा चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनिपिंग यांनी गुरुवारी केली. द्वितीय महायुद्धात जपानविरुद्ध मिळविलेल्या विजयाच्या ७० व्या वार्षिक समारोहानिमित्त आयोजित लष्करी संचलनात ते बोलत होते. यावेळी त्यांनी ही घोषणा केली. शेजारच्या देशांसोबत असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर लष्करी शक्तिप्रदर्शन करून चीनने बाह्या सरसावल्याचे या वेळी स्पष्ट झाले.
चीन आपल्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’वर १४५ अब्ज अमेरिकी डॉलर इतका अवाढव्य खर्च करतो. जगात अमेरिकेनंतर लष्करावर खर्च करणारा चीन हा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे.
लष्कराचा आकार छोटा करून आधुनिक शस्त्रांचा वापर वाढवून आधुनिकीकरण करण्यावर चीनने भर दिला आहे.
शी यांनी सध्या चीनमध्ये भ्रष्टाचाराविरुद्ध मोठी मोहीम उघडली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या या घोषणेकडे पाहिले जात आहे. त्यांच्याकडे देशाच्या अध्यक्षस्थानासोबतच सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी आॅफ चायनाचे अध्यक्षपद आणि लष्कराचेप्रमुख पदही आहे.
लष्कराची पुनर्रचना केली जात असून, ३० लष्करी अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी केली जात आहे. या अधिकाऱ्यांत केंद्रीय लष्करी आयोगाच्या माजी उपाध्यक्षांचाही समावेश आहे. २०१३ मध्ये पद स्वीकारल्यापासून त्यांनी आधुनिकीकरणावर भर दिला आहे. त्यात लष्करी अभ्यास, आधुनिक शस्त्रास्त्रे, लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे, अत्याधुनिक विमाने, विमानवाहू जहाजे यांच्या उत्पादनावर भर देण्यात आला आहे.
यावेळी शक्तिप्रदर्शन करताना ८० टक्के लष्करी सामग्री संचलनात जगासमोर आणण्यात आली. पाकिस्तान आणि रशियासह १७ देशांच्या एक हजार विदेशी सैनिकांनी संचलनात सहभाग नोंदविला. २०० लढाऊ विमानांनी अवकाशात कवायती केल्या. माजी अध्यक्ष जियांग जेमिन, हू जिंताओ आणि माजी पंतप्रधान वेन जिआबाओ यांचीही व्यासपीठावर उपस्थिती होती. त्याचबरोबर रशियाचे अध्यक्ष पुतीन, दक्षिण कोरियाचे अध्यक्ष पार्क-जीन-हाई, संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस बान की मून, भारताचे विदेश राज्यमंत्री जन. व्ही. के. सिंग यांच्यासह ३० देशांचे नेते यावेळी उपस्थित होते.