चीन पाकला देणार ११० लढाऊ विमाने
By admin | Published: April 26, 2015 01:47 AM2015-04-26T01:47:38+5:302015-04-26T01:47:38+5:30
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या पाकिस्तान दौऱ्यानंतर उभय देशांदरम्यानचे आर्थिक व संरक्षण संबंध बळकट झाल्याच्या पार्श्वभूमीवर ड्रॅगनने हा निर्णय घेतला.
इस्लामाबाद : चीन पाकिस्तानला ११० आधुनिक ‘जेएफ-१७’ लढाऊ विमाने पुरविणार आहे.
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या पाकिस्तान दौऱ्यानंतर उभय देशांदरम्यानचे आर्थिक व संरक्षण संबंध बळकट झाल्याच्या पार्श्वभूमीवर ड्रॅगनने हा निर्णय घेतला. चीन आगामी तीन वर्षांत ५० जेट विमाने देणार असल्याचे वृत्त रेडिओ पाकिस्तानने दिले आहे. मात्र, उर्वरित ६० विमानांचा चीन कधी पुरवठा करणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
जेएफ-१७ थंडर विमानाच्या निर्मीतीचे तंत्रज्ञान चीनने यापूर्वीच पाकला हस्तांतरित केले असल्यामुळे या विमानांची पाकिस्तानातही निर्मिती होते. मात्र, तालिबान दहशतवाद्यांविरुद्धच्या लढाईसाठी पाकिस्तानला तातडीने मोठ्या प्रमाणात लढाऊ विमाने हवी आहेत.
शी यांनी चीनच्या पश्चिम भागाला पाकिस्तानच्या ग्वादर बंदराशी जोडण्यासाठी ४६ अब्ज डॉलरच्या आर्थिक क्षेत्राची घोषणा केली आहे. (वृत्तसंस्था)