चीनमधील २०० अमेरिकी कंपन्या येणार भारतात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2019 06:19 IST2019-04-29T02:31:52+5:302019-04-29T06:19:32+5:30
रोजगार निर्मिती : निवडणुकीनंतर कंपन्या स्थलांतरित करण्याची तयारी

चीनमधील २०० अमेरिकी कंपन्या येणार भारतात
वॉशिंग्टन : अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापार युद्ध सुरू असताना चीनसाठी एक नकारात्मक वृत्त आहे. अमेरिकेतील जवळपास २०० कंपन्या लोकसभा निवडणुकीनंतर आपले प्रकल्प चीनमधून भारतात स्थलांतरित करणार आहेत. अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध दृढ करू पाहणाऱ्या यूएस- इंडिया स्ट्रॅटेजिक अॅण्ड पार्टनरशिप फोरमने ही माहिती दिली आहे.
या स्वयंसेवी समूहाने म्हटले आहे की, चीनऐवजी अन्य पर्याय शोधू पाहणाऱ्या या कंपन्यांसाठी भारत एक शानदार पर्याय आहे. या समूहाचे अध्यक्ष मुकेश अघी यांनी सांगितले की, अनेक कंपन्या आमच्याशी चर्चा करीत आहेत आणि विचारत आहेत की, भारतात गुंतवणूक करून कशाप्रकारे चीनला पर्याय शोधला जाऊ शकतो. निवडणुकानंतर भारतात स्थापन होणाऱ्या नव्या सरकारला हा समूह सुधारणांबाबतचा सल्ला देणार आहे. मुकेश अघी सांगितले की, भारत- अमेरिका यांच्यातील मुक्त व्यापाराचे आम्ही समर्थन करतो.
नव्या सरकारने सुधारणांना गती द्यावी
गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी नव्या सरकारने काय करायला हवे? असा प्रश्न केला असता मुकेश अघी यांनी सांगितले की, सरकारने सुधारणांची गती वाढवायला हवी. निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणायला हवी. अधिक पक्षांसोबत चर्चा करण्यावर भर द्यायला हवा. यामुळे मोठ्या देशात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होण्यास मदत होणार आहे.
चीनला दे धक्का
चीनमधील २०० हून अधिक अमेरिकी कंपन्या भारतात येण्याचा विचार करत असल्याने चीनला हा मोठा दणका मानला जात आहे. यातून भारतीय अर्थव्यवस्थेला चालना मिळणार असून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होऊ शकते.
अमेरिकेतील तंत्रज्ञान आणि भारतीय मनुष्यबळ यांच्या एकत्रीकरणातून आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. त्यामुळे या अमेरिकन कंपन्यांना कशा प्रकारे आकर्षित करायचे याचा सरकारने विचार करावा. यासाठी भूसंपादनापासून ते परवानगी आणि कर आदी बाबींमध्ये सुटसुटीतपणा आणावा लागेल.