चीन एक इंचही जमीन सोडणार नाही; रक्तरंजित संघर्षासाठी तयार- क्षी जिनपिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2018 07:11 PM2018-03-20T19:11:58+5:302018-03-20T19:13:34+5:30
क्षी जिनपिंग यांनी संसदेत केलेल्या भाषणात पुरेपूर राष्ट्रवाद भरला होता.
बीजिंग: चीन स्वत:च्या एक इंच जमिनीवरचाही हक्क सोडणार नाही. वेळ पडल्यास त्यासाठी आम्ही रक्तरंजित संघर्षाला तयार आहोत, असे चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी सांगितले. त्यांनी मंगळवारी चीनच्या संसदेत भाषण केले. काही दिवसांपूर्वीच घटनेतील दुरुस्तीमुळे क्षी जिनपिंग यांचा तहहयात चीनच्या राष्ट्राध्यक्षपदी राहण्याचा मार्ग मोकळा झाला होता.
त्यानंतर आज क्षी जिनपिंग यांनी संसदेत भाषण केले. त्यांच्या या भाषणात पुरेपूर राष्ट्रवाद भरला होता. त्यांनी म्हटले की, नव्या काळाच्या प्रारंभापासून चीनचे पुनरुज्जीवन हे आपले सर्वात मोठे स्वप्न आहे. चीनमधील जनता आणि संपूर्ण राष्ट्राची एका गोष्टीवर ठाम श्रद्धा आहे की, भविष्यात आणि आत्ताही आपल्या मालकीची एक इंचही जमीन हिसकावून घेतली जाणार नाही. परंतु, जिनपिंग यांनी सीमावर्ती परिसरात विविध देशांशी सुरु असलेल्या वादांचा कोणताही थेट उल्लेख केला नाही.
काही दिवसांपूर्वीच डोकलाम परिसरात भारत आणि चीन एकमेकांसमोर उभे ठाकले होते. दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ हा वाद सुरू होता. अखेर या प्रदेशातून दोन्ही देशांच्या सैन्याने माघार घेतली होती. याशिवाय, पूर्व चीन समुद्रातील एका बेटावरून चीनचा जपानशी वाद सुरू आहे.