लडाखमध्ये घसरला 'पारा', चीनचे 'वाजले बारा'; थंडीमुळे १० हजार सैनिक हटले मागे
By मोरेश्वर येरम | Published: January 11, 2021 08:56 PM2021-01-11T20:56:05+5:302021-01-11T21:03:31+5:30
हाडं गोठवणाऱ्या थंडीनं नाचक्की झाल्यानं चीनी सैनिक मागे हटले आहेत.
नवी दिल्ली
भारत आणि चीनमध्येलडाखच्या सीमेवर तणाव असतानाही प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरुन (एलएसी) चीनने तब्बल १० हजार सैनिक मागे हटवले आहेत. भारतीय सीमेच्या २०० किमी परिसरातून चीनी सैनिकांनी माघार घेतली आहे. लडाखमध्ये घसरलेल्या पाऱ्यामुळे चीनने हे पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे.
हाडं गोठवणाऱ्या थंडीनं नाचक्की झाल्यानं चीनी सैनिक मागे हटले आहेत. पूर्व लडाखमध्ये सध्या शून्य अंशापेक्षाही कमी तापमान आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, पारंपारिक पद्धतीने भारतीय सीमेजवळ ज्या जागेवर चीनचे सैनिक सराव करत असत त्या जागेवर सध्या कुणीही दिसत नाही.
गेल्या वर्षी मार्च-एप्रिल महिन्यात सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनने लडाखच्या सीमेवर तब्बल ५० हजार सैन्य वाढवलं होतं. आता जवळपास २०० किमी परिसरातून चीनचे सैन्य मागे हटविण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
भारतीय सैनिकांचा कडक पाहारा
एका बाजूला कडाक्याच्या थंडीमुळे चीनच्या सैनिकांचे पाय लटपटत आहेत. चीनने सैन्य मागे घेतलं आहे. तर दुसऱ्याबाजूला भारतीय सैन्य जीवाची पर्वा न करता शून्य अंश सेल्सियसपेक्षाही कमी तापमानात देखील कडक पाहारा देत आहेत. कडाक्याच्या थंडीचा फायदा घेऊन चीनी सैन्यानं घुसखोरी करू नये म्हणून भारतीय सैन्य सीमेवर २४ तास पाहारा देत आहे.