कोरोनानंततर चीनमध्ये मिळाला नवा व्हायरस, Zoonotic Langya चे 35 रुग्ण: जाणून घ्या, माणसांसाठी किती घातक?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2022 05:08 PM2022-08-09T17:08:21+5:302022-08-09T17:09:06+5:30
Zoonotic Langya : चीनच्या शेडोंग आणि हेनान प्रांतात Zoonotic Langya विषाणूचा संसर्ग झालेले ३५ रुग्ण सापडले आहेत. इतकंच नाही तर काही जनावरांनाही याचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आलीये.
Zoonotic Langya In China : एकीकजे कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे संपला नाहीये, तर दुसरीकडे चीनमध्येच पुन्हा एका नव्या विषाणूनं डोकं बाहेर काढलं आहे. तैवानच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोलनुसार चीनमध्ये आता Zoonotic Langya हा विषाणू सापडला असून ३५ जणांना त्याचा संसर्गही झाला आहे. तैवान या विषाणूची ओळख पटवण्यासाठी आणि संसर्गाची माहिती मिळवण्यासाठी मॉनिटर करायला न्युक्लिस अॅसिड टेस्टिंग मेथड सुरू करणार असल्याचं काही मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे.
Zoonotic Langya हा विषाणू चीनच्या शेडोंग आणि हेनान प्रांतात सापडला आहे. ताईपे टाईम्सनुसार हा विषाणू जनावरांमधून माणसांमध्ये पसरत असल्याचं सांगण्यात आलंय. “अभ्यासातून असं दिसून आलंय की विषाणूचा एका व्यक्तीतून दुसऱ्या व्यक्तीत प्रसार होत नाही. परंतु तो पसरू शकणार नाही असं ठामपणे सांगता येणार नाही. या विषाणूबाबात अधिक माहिती येईपर्यंत सतर्क राहायला हवं,” असं तैवानच्या सीडीसीचे उपमहासंचालक चुआंग झेन-हसियांग यांनी रविवारी सांगितलं.
सर्वेक्षणातून समोर आलेली माहिती देताना चुआंग झेन-हसियांग यांनी २ टक्के बकऱ्यांमध्ये आणि ५ टक्के श्वानांमध्ये हा विषाणू सापडल्याचं म्हटलं. तसंच हा विषाणू पसरवण्यासाठी २५ जंगली जनावरांच्या चाचण्या करून चुचुंद्री याला कारणीभूत असल्याचं म्हटलं.
काय आहेत लक्षणं?
तपासात या विषाणूची लागण झालेले ३५ रुग्ण असल्याची माहिती मिळाली आहे. तर यापैकी कोणीही एकमेकांच्या संपर्कात आलं नव्हतं. शिवाय त्यांच्या जवळच्या कोणत्याही व्यक्तीला संसर्गही झाला नाही, अशीही माहिती समोर आली आहे. ३५ रुग्णांपैकी २६ रुग्णांना ताप, थकवा, खोकला, भूक न लागणं, अंगदुखी, डोकेदुखी आणि उलटीसारखी लक्षणं दिसून आली. काही लोकांमध्ये प्लेटलेट्स कमी होणं, लिव्हर फेल्युअर आणि किडनी फेल्युअरसारखी लक्षणंही दिसून आली.