पाकच्या ९० वधूंचा चीनने रोखला व्हिसा; मानवी तस्करीचा संशय, विवाहांचे दाखवले जाते आमिष
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 06:12 AM2019-05-16T06:12:23+5:302019-05-16T06:16:29+5:30
बनावट विवाहांच्या माध्यमातून पाकिस्तानी मुलींची चीनमध्ये तस्करी केली जाते, असा वाद निर्माण झालेला असताना चीनच्या येथील दूतावासाने ९० पाकिस्तानी वधूंचा व्हिसा रोखून धरला आहे.
इस्लामाबाद : बनावट विवाहांच्या माध्यमातून पाकिस्तानी मुलींची चीनमध्ये तस्करी केली जाते, असा वाद निर्माण झालेला असताना चीनच्या येथील दूतावासाने ९० पाकिस्तानी वधूंचा व्हिसा रोखून धरला आहे.
चीनच्या येथील दूतावासाचे उपप्रमुख लिजियान झाओ मंगळवारी म्हणाले की, यावर्षी चीनच्या नागरिकांकडून पाकिस्तानी वधूंसाठी व्हिसा मागणारे १४० अर्ज आम्हाला मिळाले. त्यातील ५० व्हिसा मंजूर करण्यात आले असून, उर्वरित रोखून धरण्यात आले. २०१८ वर्षात असे व्हिसा मागणारे १४२ अर्ज आले होते.
कंत्राटी विवाहाचे आमिष दाखवून पाकिस्तानी मुलींची चीनमध्ये तस्करी करण्यात गुंतलेल्या टोळ्यांवर कारवार्ई करण्यास पाकिस्तान सरकारने नुकतेच फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीला सांगितले आहे.
गरीब ख्रिश्चन्स मुलींना पाकिस्तानात काम करीत असलेल्या किंवा पाकिस्तानला भेट देणाऱ्या चिनी पुरुषांशी लग्न केल्यास पैसा आणि चांगल्या आयुष्याचे आमिष बेकायदा विवाह जुळविणारी केंद्रे दाखवतात. या केंद्रांकडून हे चिनी लोक बनावट कागदपत्रांद्वारे एक तर ख्रिश्चन्स किंवा मुस्लिम असल्याचे दाखविले जाते. बहुतेक मुली या मानवी तस्करीच्या बळी ठरून त्यांना सक्तीने वेश्या व्यवसाय करावा लागला आहे.
दोन देशांतील वधू-वरांत विवाह होण्याच्या प्रमाणात अचानक वाढ झाल्यामुळे अधिकारी सावध झाले आणि आम्ही संबंधित पाकिस्तानी अधिकाऱ्यांना हा विषय सांगितला. (वृत्तसंस्था)
माध्यमांकडून वस्तुस्थितीचा विपर्यास
झाओ म्हणाले की, प्रसारमाध्यमांनी वस्तुस्थितीचा विपर्यास केला. मुलींना वेश्या व्यवसायात ढकलले जाते किंवा त्यांचे अवयव काढून घेतले जातात, याचा कोणताही पुरावा नाही. सगळे विवाह हे बनावट असल्याचा इन्कार करून झाओ म्हणाले की, गेल्या वर्षी ज्या चिनी नागरिकांनी त्यांच्या पाकिस्तानी पती किंवा पत्नीच्या व्हिसासाठी अर्ज केला होता त्या सगळ्यांनी अर्ज करण्यापूर्वी सर्व कायदेशीर गोष्टींची पूर्तता केली होती.