चीनची बलुनद्वारे अमेरिकेवर हेरगिरी, मोन्टाना शहरातील घटना; पेंटॅगॉन सतर्क
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2023 07:07 AM2023-02-04T07:07:10+5:302023-02-04T07:07:40+5:30
China Vs USA : अमेरिकेतील मोन्टाना शहरात हवाई दलाच्या विशेष तळाजवळ आकाशात चीनचे हेरगिरी करणारे एक बलून आढळून आल्याचा दावा त्या देशाचे संरक्षण मुख्यालय पेंटॅगॉनने केला आहे. या
वाॅशिंग्टन : अमेरिकेतील मोन्टाना शहरात हवाई दलाच्या विशेष तळाजवळ आकाशात चीनचे हेरगिरी करणारे एक बलून आढळून आल्याचा दावा त्या देशाचे संरक्षण मुख्यालय पेंटॅगॉनने केला आहे. या तळावरून आंतरखंडीय क्षेपणास्त्रे डागण्याची सुविधा आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ॲन्टनी ब्लिंकन यांच्या चीन दौऱ्याच्या दोन दिवस आधी हे बलून आढळून आले. बलूनसंदर्भात पेंटॅगॉनने केलेला दावा आम्ही तपासत आहोत, अशी सावध प्रतिक्रिया चीनने व्यक्त केली आहे.
मोन्टाना येथील हवाई तळानजीक हा बलून आकाशात किती फूट उंचीवरून उडत होता, याचा तपशील पेंटॅगॉनने दिलेला नाही. हा बलून तीन बसच्या आकाराइतका मोठा आहे. या घटनेची सविस्तर माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना देण्यात आली. चिनी बलूनद्वारे अमेरिकेतील लष्करी तळ व नागरिकांवर हल्ला होण्याची शक्यता नसली तरी त्याद्वारे होणाऱ्या हेरगिरीला रोखण्यासाठी पेंटॅगॉनने तत्काळ पावले उचलली आहेत. अमेरिकेच्या ग्रामीण भागात मोबाइल टॉवरवर चिनी बनावटीची उपकरणे बसवून हेरगिरी करण्याचा चीनचा डाव यापूर्वी उघडकीस आला होता. (वृत्तसंस्था)
हवाई दलाच्या तळाजवळ चीनचे हेरगिरी करणारे बलून. या बलूनसाठी ऊर्जा मिळावी यासाठी सौर यंत्रणाही आहे. त्यामुळे हा बलून कधीपासून अवकाशात आहे याचा शोध सुरू आहे. बराक ओबामा सत्तेत आल्यापासून हेरगिरी वाढली आहे.
युक्रेनसंदर्भात ब्लिंकन करणार चीनशी चर्चा
तैवान हा आमचाच भाग असल्याचा चीनचा दावा आहे. त्या देशावर ताबा मिळविण्यासाठी चीनने सुरू केलेल्या हालचालींवर अमेरिकेने आक्षेप घेतला आहे. तैवानवर चीनने लष्करी कारवाई केल्यास आम्ही हस्तक्षेप करू असे अमेरिकेने म्हटले आहे. अमेरिकेचे परराष्टमंत्री ॲन्टनी ब्लिंकन हे ५ व ६ फेब्रुवारी रोजी चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यावेळी ते तैवान, युक्रेन यांच्यासंदर्भात चीनशी सविस्तर चर्चा करतील.