कोरोनाची साथ असताना चीनचे दक्षिण चीन सागरात शीतयुद्ध
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 05:38 AM2020-04-16T05:38:35+5:302020-04-16T05:38:46+5:30
अलीकडेच व्हिएतनामची मासेमारी बोट बुडवली
नवी दिल्ली : कोरोना रोगाची साथ आटोक्यात आणण्यासाठी संपूर्ण जगाने लक्ष केंद्रित केलेले असताना चीन मात्र दक्षिण चीन सागरात शीतयुद्ध छेडत वर्चस्व गाजवीत आहे. अलीकडेच चीनने व्हिएतनामची एक मासेमारी बोट वादग्रस्त दक्षिण चीन सागरात धडक देऊन बुडविली, तसेच या बोटीवरून आठ जणांना ताब्यात घेत व्हिएतनामच्या अन्य दोन बोटी जप्त केल्या.
कोरोना साथीच्या फायदा घेत चीन या सागरी हद्दीत वर्चस्व राखण्यासाठी शीतयुद्ध छेडत आहे. अनेक देशांनी वेळीच लक्ष दिले नाही, तर चीनच्या कारवायांची व्याप्ती वाढत जाईल. तब्बल आठवड्यापासून चीन दक्षिण चीन सागरात मनमानी कारवाया करून या वादग्रस्त सागरीहद्दीत आपली उपस्थिती वाढवून धाक निर्माण करीत आहे. चीनशिवाय अन्य चार देशही दक्षिण चीन सागरावरील दावेदार आहेत.
मार्चपासून हवाई कवायती
तैवान, व्हिएतनाम, फिलिपीन, मलेशिया आणि ब्रुनेईचाही या वादग्रस्त सागरावर दावा आहे. या चारही देशांत कोरोनाचे ११ हजार रुग्ण आढळले आहेत. या देशांनी संरक्षणात्मक व्यवहार थांबविले आहेत.
कोरोनामुळे अन्य देशांत कहर उडाला असून, चीन मात्र उपरोक्त शेजारी देशांवर वर्चस्व गाजवीत आहे. जानेवारीपासून चीनच्या १३० बोटींनी फिलिपीनव्याप्त पगसा बेटापर्यंत मजल मारली होती. दक्षिण चीन सागरातील कृत्रिम बेटावर चीनने दोन नवीन संशोधन केंद्र उभारली आहेत. या माध्यमातून चीन नौकानयन करून स्प्राटलिस बेटात वैज्ञानिक संशोधन करीत आहेत.
मार्चपासून चीनची लढाऊ विमान तैवानच्या किनारपट्टीगत हवाई कवायती करीत आहेत. नंतर तैनात केलेले एक विमान जपानच्या लष्कराने रोखले होते. आता चीनने व्हिएतनामची एक बोट बुडविली. त्यातून चीनचा डाव स्पष्ट होतो.