डोकलाम वादात रशियाच्या भूमिकेमुळे चीनच्या पदरात पडली निराशा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2017 03:12 PM2017-09-02T15:12:15+5:302017-09-02T15:26:35+5:30
सध्याच्या जागतिक राजकारणातील परिस्थितीमुळे चीन आणि रशिया परस्परांच्या जवळ आले आहेत. दोघांमधील संबंधही दृढ होत चालले आहेत.
मॉस्को, दि. 2 - सध्याच्या जागतिक राजकारणातील परिस्थितीमुळे चीन आणि रशिया परस्परांच्या जवळ आले आहेत. दोघांमधील संबंधही दृढ होत चालले आहेत. पण असे असले तरी, डोकलामच्या मुद्यावर रशियाने चीनला अजिबात साथ दिली नाही. चीनने भारताविरोधात रशियाचे कान भरण्याचा प्रयत्न केला पण रशियाने चीनला पूरक ठरेल अशी कोणतीही भूमिका घेतली नाही. भारत-रशिया यांचे पूर्वापार असलेले संबंध आणि ब्रिक्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका यामुळे डोकलाम वादात रशियाने पूर्णपणे तटस्थतेची भूमिका घेतली.
डोकलाममधून भारत आणि चीन दोन्ही देशांनी आपले सैन्य मागे घेण्याची भूमिका जाहीर करण्याच्या काही तास आधी बिजींगमधील रशियन राजदूत अँड्रे डेनीसोव्ह यांनी रशियाची भूमिका स्पष्ट केली. दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या डोकलाम तिढयावर अखेर 28 ऑगस्टला तोडगा निघाला. दोन्ही देशांनी आपले सैन्य मागे घेतले.
भारत-चीन सीमेवर जी परिस्थिती आहे त्याबद्दल चिंता वाटते. भारत आणि चीन आमचे दोन्ही मित्र देश या वादावर तोडगा काढतील. त्यांना कुठल्या मध्यस्थाची आवश्यकता आहे असे आम्हाला वाटत नाही असे डेनीसोव्ह यांनी रशियन पत्रकारांना सांगितले. चीनने कुटनितीक स्तरावर रशियाला सोबतीला घेऊन भारताविरोधात आघाडी उभारण्याचा प्रयत्न केला. पण रशियाच्या भूमिकेमुळे चीनला त्यात यश मिळाले नाही. चीन आणि रशिया हे दोन्ही देश अमेरिकेच्या विरोधात आहेत. त्यामुळे सध्याच्या घडीला जागतिक राजकारणात या दोन देशांची जवळीक वाढली आहे.
कृपा करुन पाकिस्तानमधील दहशतवादाचा मुद्दा ब्रिक्समध्ये उपस्थित करु नका
पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनमध्ये पार पडणा-या ब्रिक्स परिषदेला हजेरी लावणार असून यावेळी पाकिस्तानशी संबंधित दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करु नका असा अप्रत्यक्ष संदेशच चीनने मोदींना दिला आहे. पाकिस्तानशी संबधित दहशतवादाचा मुद्दा चर्चेला आल्यास आपला आक्षेप असेल असं चीनने सांगितलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गतवर्षी गोवामध्ये पार पडलेल्या ब्रिक्स परिषदेत बोलताना पाकिस्तान म्हणजे दहशतवाद्यांचा अड्डा असल्याचं बोलले होते. यामुळे चीनला पुन्हा एकदा मोदी हा उल्लेख करतील अशी चिंता आहे.
'पाकिस्तानशी संबंधित दहशतवादाचा मुद्दा आला की, भारत नेहमीच आपली चिंता व्यक्त करताना दिसतो. ब्रिक्स परिषदेत चर्चा करण्यासाठी हा योग्य विषय आहे असं मला वाटत नाही', असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग बोलल्या आहेत. हा विषय चर्चेला आला तर चीनी नेते आपला मित्रराष्ट्र पाकिस्तानची बाजू घेतील, ज्याचा परिणाम ब्रिक्स परिषदेवर होईल असंही हुआ चुनयिंग यांनी सांगितलं आहे.