चीनची अर्थव्यवस्था हातातून निसटू लागलीय; जिनपिंगनी पहिल्यांदाच उघडपणे कबूल केले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2024 05:37 PM2024-01-01T17:37:28+5:302024-01-01T17:37:42+5:30
रोजगार नसल्याने अनेकांना दररोजचा खर्च भागविणे कठीण होऊ लागले आहे. देशात परिस्थिती ठीक नाहीय - जिनपिंग.
गेल्या काही महिन्यांपासून चीनच्या अर्थव्यवस्थेबाबत चांगल्या वाईट बातम्या येत आहेत. परंतु, त्याल अधिकृत दुजोरा मिळत नव्हता. जगातील सर्वात मोठी रिअल इस्टेट कंपनी एव्हरग्रँड बुडाली. यानंतर बँका आणि अन्य कंपन्या देखील हेलकावे खात होत्या. तरीही चीन खबर लागू देत नव्हता. परंतु, आता चीनच्या राष्ट्राध्यक्षांना उघडपणे कबुली द्यावी लागली आहे.
देशातील परिस्थिती ठीक नाहीय, कंपन्यांना झगडावे लागत आहे. लोकांना नोकऱ्या मिळत नाहीत, असे जिनपिंग यांनी कबूल केले आहे. मावळत्या वर्षाच्या पूर्वसंध्येला जिनपिंग यांनी एका मुलाखतीमध्ये चीनची अर्थव्यवस्था ढासळल्याचे म्हटले आहे.
चीनची अर्थव्यवस्था कोलमडण्यामागे थंड पडलेली मागणी, वाढलेली बेरोजगारी, रिअल इस्टेट संकट आणि परदेशी कंपन्यांनी काढता पाय घेतल्याने गुंतवणूकीवर परिणाम आदी कारणे त्यांनी सांगितली आहेत. शी जिनपिंग यांनी म्हटले की काही कंपन्यांना संकटाचा सामना करावा लागला आहे. रोजगार नसल्याने अनेकांना दररोजचा खर्च भागविणे कठीण होऊ लागले आहे. सरकार अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी वेगाने काम करणार असल्याचे आश्वासन जिनपिंग यांनी देशवासियांना दिले.
चीनच्या अर्थव्यवस्थेला या वर्षी अनेक समस्यांचा सामना करावा लागला आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचा एक तृतीयांश वाटा असलेले रिअल इस्टेट क्षेत्र मोठ्या संकटात आहे. हळूहळू इतर क्षेत्रांवरही त्याचा परिणाम होऊ लागला आहे. बेरोजगारीचा दरही उच्चांकावर आहे. स्थानिक सरकारांवरील कर्जाचा बोजा सतत वाढत आहे. विकास आणि रोजगार पुन्हा रुळावर आणण्यासाठी सरकारने अनेक उपाय योजले आहेत परंतु आजपर्यंत त्यांचे कोणतेही परिणाम दिसून आलेले नाहीत. चीनचा अमेरिकेसोबतचा तणावही वाढत चालला आहे. यामुळे त्याचा परिणाम शेअर बाजारावरही होताना दिसत आहे.