जगातील सर्वात लांब बोगदा खोदण्यासाठी चीनची खटपट, ब्रह्मपुत्रचे पाणी पळवण्यासाठी कारस्थान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2017 08:20 PM2017-10-30T20:20:04+5:302017-10-30T20:22:35+5:30
डोकलाम प्रश्नी कुटनीतीमध्ये भारताकडून चारीमुंड्या चीत झाल्यानंतर आता चीनने भारताला विविध आघाड्यांवर अडचणीत आणण्यासाठी कारस्थाने सुरू केली आहेत.
नवी दिल्ली - डोकलाम प्रश्नी कुटनीतीमध्ये भारताकडून चारीमुंड्या चीत झाल्यानंतर आता चीनने भारताला विविध आघाड्यांवर अडचणीत आणण्यासाठी कारस्थाने सुरू केली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून चीनने जगातील सर्वात लांब बोगदा खोदण्याचा घाट घातला आहे. या बोगद्याद्वारे ब्रह्मपुत्रचे पाणी शिनजिंयांग प्रांतातील वाळवंटी प्रदेशात नेण्याचा चीनचा कुटील डाव आहे.
एकूण एक हजार किमी लांबीचा बोगदा खोदण्याचा चीनचा प्रयत्न असून, हा बोगदा जगातील सर्वात लांब बोगदा असेल असे जाणकारांचे मत आहे. मात्र या प्रकल्पावर अद्याप काम सुरू झालेले नाही. मात्र त्यासाठी चीनने युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे. तसेच हा बोगदा खोदण्याच्या कामाची रंगीत तालीमही सुरू आहे.
साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, "सध्या चीन हा सर्वात मोठा बोगदा खोदण्यासाठीच्या आपल्या क्षमतेची चाचपणी करण्यासाठी एक छोटा बोगदा खोदण्याच्या प्रकल्पावर काम करत आहे. चीनने ऑगस्ट महिन्यात युन्नान प्रांताच्या मध्यभागात या बोगद्याचे काम सुरू केले आहे. हा बोगदा 600 किमीपेक्षा जास्त लांबीचा असेल. हा बोगदा खोदताना इंजिनिअर त्या तंत्राचे परीक्षण करत आहेत ज्याद्वारे यारलिंग जांग्बोचे पाणी तिबेटमधून शिनजियांग प्रांतात नेता येईल.
ब्रम्हपुत्र या नदाचा जन्म तिबेटमध्ये होतो. तेथे त्याला यारलुंग जांग्बो या नावाने संबोधित केले जाते. हा बोगदा तिबेटच्या पठाराच्या खालील भागातून अनेक ठिकाणी जाईल. जी ठिकाणे धबधब्यांनी जोडलेली असतील.
दरम्यान, डोकलाममध्ये सध्या कोणताही नवीन विवाद निर्माण झालेला नाही, असे डोकलाममधील चिनी सैनिकांच्या सध्याच्या हालचालींसंदर्भातील मिळालेल्या अहवालावरुन परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केले आहे. डोकलाम सीमेवर चिनी सैनिक तळ ठोकून असून तेथे बांधकाम सुरू आहे, असा दावा सॅटलाइटद्वारे समोर आलेल्या काही छायाचित्रांच्या माध्यमातून करण्यात आला होता. मात्र परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केले आहे की, ''वादग्रस्त भूभागावर चीनकडून सध्या नव्यानं अशा कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत. शिवाय, ज्या बांधकामाची चर्चा सुरू झाली आहे ते बांधकाम चिनी सीमेच्या आतमध्येच झाले आहे''.
'डोकलाम सीमेवर कोणताही नवा विवाद सुरू झालेला नाही. यावरुन समोर आलेला अहवाल हा खोटा आणि चुकीचा आहे',असे परराष्ट्र मंत्रालायचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी सांगितले. 28 ऑगस्टच्या करारानंतर वादग्रस्त भूभागावर नव्यानं कोणत्या प्रकारे हालचाली झालेल्या नाहीत, असे पुढे रवीश कुमार म्हणाले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी डोकलामचा वाद चर्चेत होता. 16 जूनपासून पुढे 7 दिवस सुरू असलेल्या वादाच्या दरम्यान भारत-चीनचे सैनिक आमने-सामने होते. यामुळे दोन्ही देशांमध्ये तणावपूर्ण अशी परिस्थिती निर्माण झाली होती. दोन्ही देशांमध्ये तडजोडीचा फॉर्म्युला ठरल्यानंतर 28 ऑगस्टला भारत आणि चीनचे सैनिक डोकलाममध्ये संघर्षाचा जो केंद्रबिंदू होता त्या ठिकाणापासून 150 मीटर मागे गेले. जून महिन्यामध्ये भारतीय जवानांनी सिक्कीममध्ये सीमा ओलांडून चीनच्या रस्ते निर्माण करण्याच्या काम थांबवलं होतं.