‘हनी’ प्रकरणामुळे चीनचे ‘परराष्ट्रमंत्री’ गायब?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 07:15 AM2023-07-27T07:15:28+5:302023-07-27T07:15:45+5:30

जगात असे काही देश आहेत, जिथे एखादा माणूस गायब झाला की तो लवकर परत सापडत नाही.

China's 'Foreign Minister' missing due to 'Honey' case? | ‘हनी’ प्रकरणामुळे चीनचे ‘परराष्ट्रमंत्री’ गायब?

‘हनी’ प्रकरणामुळे चीनचे ‘परराष्ट्रमंत्री’ गायब?

googlenewsNext

जगात असे काही देश आहेत, जिथे एखादा माणूस गायब झाला की तो लवकर परत सापडत नाही. बऱ्याचदा तर ही माणसं आयुष्यात परत कधीच दिसत नाहीत. अर्थातच यात प्रसिद्ध व्यक्ती, राजकारणी, कलावंत, लेखक आणि टीकाकार यांचा समावेश असतो. या यादीत चीन कायमच अग्रेसर राहिला आहे. दर काही कालावधीनंतर इथून प्रसिद्ध व्यक्ती गायब होतात, काही जण नंतर ‘सापडतात’, पण त्यांचे ‘दात, नखं आणि आयाळ’ काढून टाकलेली असते. 

याच यादीत आता आणखी एक नाव चर्चेत आहे ते म्हणजे चीनचे ‘परराष्ट्रमंत्री’ किन गांग! अर्थात, हे पद आता त्यांच्याकडे राहिलेलं नाही. ‘बेपत्ता’ गांग यांना त्यांच्या पदावरून तडकाफडकी हटवण्यात आलं असून त्यांच्या जागी वांग यी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गांग यांच्या गायब होण्याला बरोब्बर एक महिना उलटून गेला आहे. २५ जून रोजी ते शेवटचे एका सार्वजिनक ठिकाणी दिसले होते, त्यानंतर आजपर्यंत त्यांचा अतापता कोणालाच ठाऊक नाही. एवढंच काय, चिनी सरकारनंही याबाबत कानावर हात ठेवले आहेत. 

राष्ट्राध्यक्षपदानंतरच्या अतिशय महत्त्वाच्या पदावरील, इतक्या उच्च स्थानावरील व्यक्ती एक महिन्यापासून कुठे आहे, त्या व्यक्तीचं काय झालं, त्यांचा ठावठिकाणा कुठे आहे, याबाबत कोणालाच काहीच माहीत नसणं शक्य नाही. यात नक्कीच काहीतरी काळंबेरं आहे, असा संशय अनेकांना येतो आहे. त्यामुळे त्यांच्याबाबतच्या चर्चांना आता केवळ चीनमध्येच नाही, तर अख्ख्या जगभरात चर्वितचर्वण सुरू आहे.

किन गांग मग नेमके आहेत तरी कुठे? त्यांचं काय झालं? ते आकाशात हरवले की पाताळात गायब झाले?... त्यांच्या गायब होण्याबाबत काही ‘थिअरीज’ मांडल्या जात आहेत. पहिली थिअरी म्हणजे किन गांग यांची लोकप्रियता अलीकडच्या काळात प्रचंड वाढू लागली होती. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या जागी लोक गांग यांना पाहायला लागले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्यांची प्रतिमा चांगली होती. चीनला कोणताही कमीपणा न येऊ देता, कुठलीही माघार न घेता चीन-अमेरिका यांच्या संबंधांतली कटुता त्यांनी कमी केली होती. एवढंच नाही, चीन आणि अमेरिका या दोन देशांमध्ये कोणीही मोठा नाही आणि कोणीही छोटा नाही, अशी भूमिका मांडताना हे दोन देश जर बलवान राहिले तरच अख्ख्या जगाचं भलं होईल, असंही ते म्हणाले होते. 

गांग यांना ‘वूल्फ वॉरिअर’ असंही म्हटलं जातं. वूल्फ वॉरिअर म्हणजे असे मुत्सद्दी; जे आपल्या टीकाकारांना अतिशय तडाखेबंद उत्तर देतात, त्यांना अक्षरश: शिंगावर घेतात, जेणेकरून ‘आपल्या’ वाटेला जाण्याची हिंमत ते पुन्हा करणार नाहीत. गांग यांची वाढती लोकप्रियता आणि त्यांची प्रतिमाच त्यांच्या गायब होण्याचं कारण आहे असं सांगितलं जातंय. 

गांग यांच्या अदृश्य होण्याबाबत दुसरी थिअरी मांडली जातेय ती म्हणजे त्यांचं आणि केंब्रिज विद्यापीठाची पदवीधर अमेरिकन पत्रकार, टीव्ही ॲँकर फू शियोतियान यांच्यासोबतचं कथित प्रेमप्रकरण! गांग हे जसे गायब आहेत, तशीच काही दिवसांपासून फू देखील ‘गायब’ आहे. चिनी सोशल मीडिया ‘वीबो’ आणि सर्च इंजिन ‘बाइडो’वर या दोघांबाबतच्या खमंग बातम्यांनाही ऊत आला आहे. किन गांग यांचं हे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असल्याचं म्हटलं जात आहे. गांग आणि फू यांचं लग्न झालेलं नाही, पण त्यांना एक मुलगा आहे, असं काही जण छातीठोकपणे सांगताहेत. चिनी कम्युनिस्ट पार्टीच्या धोरणानुसार ‘अशा’ संबंधांना सक्त मनाई आहे. किन गांग यांच्या या गुलाबी प्रतिमेमुळेही शी जिनपिंग यांनी त्यांना ‘गायब’ केल्याचं म्हटलं जात आहे. 

फू शियोतियान हिनं गेल्या वर्षीच एका मुलाला जन्म दिला. त्याबाबत तिनं केलेलं एक ट्विट प्रचंड गाजलं होतं. मला एक मुलगा आहे आणि या मुलाचा बाप मूळ चिनी वंशाचा आहे, असं तिनं म्हटलं होतं, पण मुलाच्या बापाचा खुलासा मात्र तिनं केला नव्हता. त्यावरूनही चीनमध्ये सध्या खमंग चर्चा रंगली आहे. चिनी विदेश मंत्रालयाच्या वेबसाइटवर गांग यांच्या प्रोफाइलमध्ये म्हटलं आहे, गांग विवाहित असून त्यांना एक मुलगा आहे. 

खरंच ती ‘डबल एजंट’ आहे?

मार्च २०२२ मध्ये एका टीव्ही शोसाठी फू हिनं गांग यांची मुलाखत घेतली होती. ‘टॉक विथ द वर्ल्ड लीडर्स’ या प्रोग्रामची ती होस्ट आहे. आतापर्यंत पन्नास देशांच्या राजदूतांसह जगभरातील तब्बल ३०० बड्या नेत्यांच्या मुलाखती तिनं घेतल्या आहेत. ती ‘डबल एजंट’ असल्याचा दावाही काही जण करीत आहेत. चीननं मात्र या ‘बातम्यां’ची पुष्टीही केलेली नाही आणि खंडनही केलेलं नाही. त्यामुळे हे गूढ आणखीच वाढलं आहे.

Web Title: China's 'Foreign Minister' missing due to 'Honey' case?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :chinaचीन