चीनचा विकासदर घसरून आला ४.९ टक्क्यांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 05:35 AM2021-10-19T05:35:39+5:302021-10-19T05:36:17+5:30
उत्पादन क्षेत्रातील मंदी आणि वीज वापरावरील निर्बंध यामुळे चीनच्या विकास दराला जबर धक्का
नवी दिल्ली : जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या चीनला जबर धक्का बसला असून, ड्रॅगनच्या अर्थव्यवस्थेचा विकासदर सप्टेंबरला संपलेल्या तिमाहीत घसरून ४.९ टक्क्यांवर आला आहे. आधीच्या तिमाहीत तो ७.९ टक्के होता.
उत्पादन क्षेत्रातील मंदी आणि वीज वापरावरील निर्बंध यामुळे चीनच्या विकास दराला जबर धक्का बसला आहे. कोरोना विषाणूच्या साथीमुळे चीनची अर्थव्यवस्था आधीच अनेक संकटांचा सामना करीत आहे. नव्या संकटामुळे साथीच्या प्रभावातून पूर्णत: बाहेर पडण्याचा अर्थव्यवस्थेचा मार्ग खडतर होईल, असे तज्ज्ञांना वाटते.
वास्तविक साथीच्या प्रभावातून बाहेर पडणारा सर्वात पहिला देश म्हणून चीनकडे पाहिले जात होते. चालू वर्षाच्या सुरुवातीला काही महिन्यांत चीनची अर्थव्यवस्था तेजीने वाढली होती. आता मात्र अर्थव्यवस्थेला अनेक पातळीवर हादरे बसत आहेत. चीनमधील संपत्ती बाजार जोरात आपटला आहे. वीज संकटामुळे उद्योगांवर मोठा परिणाम झाला आहे. ग्राहकांची मागणी कमजोर झाली आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून अर्थव्यवस्थेची गती मंदावली आहे.
साेमवारी चीनने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सप्टेंबरला संपलेल्या तिमाहीत चीनचा विकासदर ४.९ टक्के होता. त्याआधीच्या तिमाहीत तो ७.९ टक्के होता. या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत तो तब्बल १८.३ टक्के होता.
चीनच्या राष्ट्रीय सांख्यिकी ब्युरोचे प्रवक्ता फू लिंगहुई यांनी सांगितले की, यंदा पहिल्या तीन तिमाहींतील आर्थिक वृद्धी दरातील ग्राहक हिस्सेदारी ६४.८ टक्के राहिली. पहिल्या तीन तिमाहींत ग्राहकोपयोगी वस्तूंची एकूण विक्री ४,९०० अब्ज डॉलर राहिली. त्याचप्रमाणे या काळातील औद्योगिक उत्पादन ११.८ टक्क्यांनी वाढले. आंतरराष्ट्रीय स्तरावर अनिश्चितता वाढत आहे.