CPEC प्रकल्पात पाकिस्तानी लष्कराला सक्रिय करण्याचा चीनचा इरादा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2017 08:08 PM2017-12-09T20:08:05+5:302017-12-09T20:17:37+5:30
सीपीईसी प्रकल्पासाठी चीनकडून देण्यात येणा-या निधीमध्ये पाकिस्तानात मोठया प्रमाणावर भ्रष्टाचार सुरु आहे.
बिजींग - सीपीईसी प्रकल्पासाठी चीनकडून देण्यात येणा-या निधीमध्ये पाकिस्तानात मोठया प्रमाणावर भ्रष्टाचार सुरु आहे. त्यामुळे चीनने सध्या या प्रकल्पातंर्गत बांधण्यात येणा-या तीन महत्वाच्या रस्त्यांसाठीचा निधी रोखला आहे. हा भ्रष्टाचार कमी व्हावा यासाठी पाकिस्तानी लष्कराने सीपीईसी (CPEC) प्रकल्पात सक्रिय होऊन महत्वाची भूमिका बजावावी अशी चीनची इच्छा आहे.
दक्षिण आशियावर अभ्यास करणा-या युरोपियन फाऊंडेशनच्या थिंक टँकने आपल्या अहवालात सीपीईसी प्रकल्पाबद्दल हे म्हटले आहे. चीन आणि पाकिस्तानला जोडणा-या सीपीईसी प्रकल्पात चीनने मोठया प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोरतंर्गत (CPEC) रस्त्यांसह विविध पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची उभारणी सुरु आहे. यासाठी चीनकडून पाकिस्तानला मोठया प्रमाणात अर्थसहाय्य केले जात आहे. पाकिस्तानात लष्कर हे सत्तेचे सर्वात महत्वाचे केंद्र आहे. त्यामुळे आता थेट लष्करालाच सक्रीय करण्याची चीनची इच्छा आहे.
भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे चीनने तात्पुरता निधी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. चीनच्या या कृतीने पाकिस्तानला जबर धक्का बसल्याचे वृत्त पाकिस्तानी माध्यमांनी दिले होते. चीनकडून नवीन मार्गदर्शकतत्व जारी झाल्यानंतर पुन्हा फंडिग सुरु होईल असे वरिष्ठ सरकारी अधिका-यांनी सांगितले.
चीनने वन बेल्ट वन रोड ही महत्वाकांक्षी योजना आखली असून 60 अब्ज डॉलर्सचा सीपीईसी प्रकल्प या योजनेतील महत्वाचा टप्पा आहे. पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधून जाणारा हा प्रकल्प बलुचिस्तान आणि चीनच्या शिनजियांग प्रांताला जोडणार आहे. चीनच्या निर्णयाचा डेरा इस्माइल खान ते हॉब रोड, हुझदार ते बासीमा रोड आणि रायकोट ते थाकोट या तीन प्रकल्पाच्या कामावर परिणाम होणार आहे.