नेपाळचे सरकार वाचविण्याचा चीनकडून उघडपणे खटाटोप, चिनी राजदूतांच्या ओली विरोधकांशी भेटीगाठी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 05:36 AM2020-07-08T05:36:00+5:302020-07-08T05:36:35+5:30
नेपाळ कम्युनिस्ट पक्ष अडचणीत येऊ नये यासाठी पक्षातील नेत्यांनी आपसातील मतबेद मिटवावेत असे चीनला वाटते. चीनचे राजदूत व वकिलात नेपाळ सरकार, येथील राजकीय पक्ष, बुद्धिवंत यांच्यासह सर्वसामान्य नेपाळी नागरिकाशीही चांगले संबंघ राखून आहे.
काठमांडू : सत्ताधारी नेपाळ कम्युनिस्ट पक्षातील (एनसीपी) बंडाळीने कोसळण्याच्या बेतात असलेले पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांचे सरकार वाचविण्यासाठी चीनने खटाटोप सुरु केला असून त्याचाच एक भाग म्हणून नेपाळमधीलचीनच्या राजदूत ओली विरोधकांच्या भेटी घेऊन त्यांचे मन वळविण्याचे काम करत आहेत. आश्चर्याची गोष्ट अशी की, मित्र असला तरी दुसऱ्या देशाच्या अंतर्गत राजकारणात अशा प्रकारे हस्तक्षेप करण्यावर जगातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर चीनने आपले हे उपद््व्याप उघडपणे मान्य करून त्याचे ठामपणे समर्थनही केले आहे.
सूत्रांनुसार बीजिंगमधून मिळालेल्या इशाºयानुसार चीनच्या नेपाळमधील राजदूत होयू यान्क्वी यांनी ओली सरकार वाचविण्याच्या हालचाली वेगाने सुरु केल्या आहेत. राजदूत यान्क्वी यांनी मंगळवारी ‘एनसीपी’चे ज्येष्ठ नेते झालानाथ खनाल यांची भेट घेऊन त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. त्याआधी त्यांनी नेपाळच्या राष्ट्रप्रमुख विद्यादेवी भंडारी व ‘एनसीपी’चे आणखी एक ज्येष्ठ नेते माधव कुमार नेपाल यांची याच उद्देशाने भेट घेतली होती.
माजी पंतप्रधान असलेले नेपाल व खनाल हे दोघेही ‘एनसीपी’मधील ओलीविरोधी बंडाळीचे नेते व प्रभावशाली प्रतिस्पर्धी पुष्प कमल दहाल (प्रचंदा) यांचे कट्टर समर्थक आहेत. स्वत: ‘प्रचंदा’ यांनी राजदूत यान्क्वी यांना भेटण्याचे आत्तापर्यंत तरी टाळले आहे.
वकिलातीने केले समर्थन
राजदूतांच्या या भेटीगाठींचे समर्थन करताना नेपाळमधील चीनच्या वकिलातीचे प्रवक्ते झांग सी यांनी ‘काठमांडू पोस्ट’ या दैनिकास सांगितले: नेपाळ कम्युनिस्ट पक्ष अडचणीत येऊ नये यासाठी पक्षातील नेत्यांनी आपसातील मतबेद मिटवावेत असे चीनला वाटते. चीनचे राजदूत व वकिलात नेपाळ सरकार, येथील राजकीय पक्ष, बुद्धिवंत यांच्यासह सर्वसामान्य नेपाळी नागरिकाशीही चांगले संबंघ राखून आहे. उभय बाजूंच्या हिताच्या बाबींवर वेळोवेळी विचारविनिमय करणे हा याचाच एक भाग आहे.