जगात असेल चीनचे स्वत:चे अंतराळ स्थानक; तीन अंतराळवीरांना घेऊन पोहोचले शेझोऊ-१२ यान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 05:51 AM2021-06-18T05:51:28+5:302021-06-18T05:51:42+5:30

आपल्या अंतराळ स्थानकाच्या निर्मितीसाठी चीनने २०२१ ते २०२२ दरम्यान ११ वेळा अंतरीक्ष यानांना पाठविण्याची योजना बनविली आहे. त्यातील दोन मोहिमा पूर्ण झाल्या आहेत. गेल्या शनिवारी चीनने तियांजू-२ कार्गो शीप पाठविले.

China's own space station; The Shezhou-12 spacecraft arrived with three astronauts | जगात असेल चीनचे स्वत:चे अंतराळ स्थानक; तीन अंतराळवीरांना घेऊन पोहोचले शेझोऊ-१२ यान

जगात असेल चीनचे स्वत:चे अंतराळ स्थानक; तीन अंतराळवीरांना घेऊन पोहोचले शेझोऊ-१२ यान

Next

बीजिंग :   चीनच्या तीन अंतराळवीरांना सोबत घेऊन गोबी मरूभूमीतून झेपावल्यानंतर काही तासांतच चीनचे अंतराळ यान चीन उभारत असलेल्या अंतराळ स्थानकावर यशस्वीपणे पोहोचले. ही  घटना अंतराळ शक्ती होण्याच्या चीनच्या महत्त्वाकांक्षी प्रयत्नांचे मोठ यश मानल जाते.

चायना मॅन्ड स्पेस एजन्सीने (सीएमएसए) दिलेल्या माहितीनुसार शेझाऊ-१२ अंतराळ यान गुरुवारी दुपारी अंतराळ स्थानकाच्या कोर मॉड्यूल तियान्हेला  यशस्वीरीत्या संलग्न झाले. गुरुवारी सकाळी हे यान रवाना करण्यात आले होते. स्थानिक वेळेनसुार हे यान दुपारी ३.५४ वाजता तियान्हेच्या पुढच्या भागाला जोडले गले. 
ही सर्व प्रक्रिया पूर्ण होण्यास ६.५ तास लागले. चीनच्या अलीकडच्या मंगळ आणि त्याआधीची चांद्र मोहिमेनंतरचा सर्वाधिक प्रतिष्ठित आणि रणनीतिदृष्ट्या महत्त्वपूर्ण मानला जाणारा हा अंतराळ प्रकल्प आकाशातील चीनचा प्रहरी असेल. यामाध्यमातून उर्वरित जगावर चीनचे अंतराळवीर बारकाईने नजर ठेवतील. तियान्हेवर उतरल्यानंतर अंतराळवीर नीये हेशेंग (५६), लियू बूमिंग(५४) आणि तांग होंगबो (४५) तीन महिन्यांच्या मोहिमेवर  तेथे राहतील. यादरम्यान ते अंतराळ केंद्र उभारण्याचे काम करतील. हे अंतराळ केंद्र पुढच्या वर्षापर्यंत तयार होण्याची आशा आहे.

आपल्या अंतराळ स्थानकाच्या निर्मितीसाठी चीनने २०२१ ते २०२२ दरम्यान ११ वेळा अंतरीक्ष यानांना पाठविण्याची योजना बनविली आहे. त्यातील दोन मोहिमा पूर्ण झाल्या आहेत. गेल्या शनिवारी चीनने तियांजू-२ कार्गो शीप पाठविले.
चीन एजन्सीच्या माहितीनुसार ११ पैकी तीन वेळा त्यांच्या यानांतून स्थानकाचे मॉड्यूल, चार वेळा कार्गो स्पेसशिप आणि चार वेळा अंतरीक्ष प्रवासी स्थानकासाठी रवाना होतील.
चीन २०२२ पर्यंत पृथ्वीचे भ्रमण करतील असे १० मॉड्यूल सुरू करू इच्छितो.

सगळ्यात पहिल्या टप्प्यात २९ एप्रिल रोजी चीनने या स्थानकाचे एक महत्त्वाचे मॉड्यूल पाठविले होते. तियानहे मॉड्यूलमध्ये अंतराळ स्थानकावर काम करणाऱ्या प्रवाशांना राहण्यासाठी क्वॉर्टर बनले आहेत. त्या केबिन्समध्ये राहणारे अंतराळ प्रवासी बाहेर येऊन किती तरी कामे करतील. पुढे चालून केबिन्समधून अंतराळ प्रवाशांनी बाहेर येणे ही सामान्य बाब होईल.

५ वर्षांतील चीनची 
ही पहिली मोहीम...

१ कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाच्या पुढच्या महिन्यातील शताब्दी महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.
२ पाच वर्षांतील चीनची ही पहिली मोहीम आहे. या  मोहिमेत मानवला अंतराळात पाठविण्यात आले आहे. ‘तियान्हे’ हे चीनने रवाना केलेले तिसरे आणि सर्वात भव्य अंतराळ स्थानक आहे.
३  चीनने सातवेळा अंतराळात आपले अंतराळवीर पाठविले आहेत; परंतु, अंतराळ स्थानक स्थापन करण्यादरम्यान अंतराळवीरांना सोबत घेऊन जाणारी ही चीनची पहिली अंतराळ मोहीम आहे.
४  चीनच्या या हायटेक  मोहिमेचे नेतृत्व ५६ वर्षांचे नीये हेशेंग  करीत आहेत. त्यांच्यासोबत लियू बूमिंग (५४) आणि तांग होंगबो हे मोहिमेत सहभागी आहेत.
५  चीनने पाच वर्षांपूर्वी २०१६ मध्ये मानवाला अंतराळात पाठविले होते. २०१६मध्ये दोन पुरुष अंतराळवीर ‘शेझोऊ-११’ या यानातून अंतराळात रवाना झाले होते आणि ३३ दिवस राहिले होते.
६  गुरुवारी अंतराळात गेलेले तीन सदस्यांचे पथक ३३ दिवस अंतराळात राहून २०१६चा विक्रम मोडण्याची आशा आहे. हे अंतराळवीर तीन महिने अंतराळात राहून दुरुस्ती आणि देखभाल यांसारखी कामे करतील.

केंद्राचे आयुष्य १५ वर्षे असेल
स्थानकाचे आयुष्य १५ वर्षांचे गृहीत धरले गेले आहे. चीनच्या कोर कॅप्सलूची लांबी ४.२ मीटर आणि डायमीटर १६.६ मीटर आहे. याच जागेवरून पूर्ण अंतराळ स्थानकाचे संचालन केले जाईल. अंतराळ प्रवासी याच जागेत राहून पूर्ण अंतराळ केंद्राचे नियंत्रण करू शकतील. या मॉड्यूलमध्ये सायंटिफिक एक्सप्रिमेंट करण्याचीही जागा असेल. या कॅप्सूलमध्ये कनेक्टिंग सेक्शनचे तीन भाग असतील. त्यात एक एक लाईफ-सपोर्ट, दुसरा कंट्रोल सेक्शन आणि तिसरा रिसोर्स सेक्शन असेल.

अंतराळ स्थानकाचे नाव काय?
चीनने आपल्या अंतराळ स्थानकाला टियागाॅन्ग असे नाव दिले आहे. चीनच्या भाषेत त्याचा अर्थ ‘स्वर्गाचा महाल’ होतो. हे मल्टिमॉडेल अंतराळ स्थानक मुख्यत: तीन भागांनी बनलेले असेल. त्यात एक अंतराळ कॅप्सूल आणि दोन प्रयोगशाळा असतील. या सगळ्यांचे एकूण वजन ९० मेट्रिक टनच्या जवळपास असेल. अंतराळ स्थानकाच्या कोर कॅप्सूलचे नाव तियान्हे ठेवण्यात आले आहे. याचा अर्थ स्वर्गाचा सदभाव आहे.

चीन अंतराळची 
मोठी शक्ती बनतोय

अंतराळ विज्ञानमध्ये एक मोठी शक्ती बनत चाललेल्या चीनने गेल्या वर्षी मंगळ अभियानही सुरू केले होते. चीनचा एक रोव्हर आता मंगळ ग्रहाबद्दल माहिती गोळा करीत आहे. अंतराळ विज्ञान क्षेत्रात चीनने उशिरा सुरुवात केली. त्याने पहिल्यांदा २००३ मध्ये आपल्या अंतराळ प्रवाशाला ऑर्बिटमध्ये पाठविले. सोव्हिएत रशिया आणि अमेरिकेनंतर हे यश मिळविणारा चीन तिसरा देश बनला. आतापर्यंत चीनने दोन अंतराळ केंद्र टियागाॅन्ग-२ ऑर्बिटमध्ये पाठविले आहेत. ही दोन्ही केंद्रे ट्रायल स्टेशन्स होती. ती काहीच वेळ कक्षेत टिकून राहणार होती. परंतु, तियानहे कमीत कमी १० वर्षे कक्षेत काम करील. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक २०२४ मध्ये काम बंद करून टाकेल. त्यावेळी चीनचे तियानहे हे बहुधा एकमेव अंतराळ केंद्र पृथ्वीच्या कक्षेत असेल. चीनची योजना या वर्षाअखेर आपल्या पहिल्या स्वदेशी अंतराळ स्थानकाला सुरुवात करण्याची आहे. आतापर्यंत फक्त रशिया आणि अमेरिकेनेच असे यश मिळविले आहे. सध्या फक्त अमेरिकेची अंतराळ संस्था ‘नासा’चे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकच सक्रिय आहे.

Web Title: China's own space station; The Shezhou-12 spacecraft arrived with three astronauts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :chinaचीन