मसूद अझहर प्रकरणावर स्वत:च्या भूमिकेची चीनकडून समीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 04:31 IST2019-04-20T04:30:51+5:302019-04-20T04:31:00+5:30
चीन सध्या अशा फॉर्म्युल्याच्या शोधात आहे जेणेकरून चीनने यावर वेगळी भूमिका घेतली तर चीनच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेला तडा जाऊ नये.

मसूद अझहर प्रकरणावर स्वत:च्या भूमिकेची चीनकडून समीक्षा
बीजिंग : जैश-ए- मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहर मुद्यावर चीन सध्या अशा फॉर्म्युल्याच्या शोधात आहे जेणेकरून चीनने यावर वेगळी भूमिका घेतली तर चीनच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेला तडा जाऊ नये. कारण, २५ ते २७ एप्रिलदरम्यान बीजिंगमध्ये ‘बेल्ट अॅण्ड रोड परिषदे’चे आयोजन होत आहे.
बेल्ट अॅण्ड रोड इनिशिएटिव्ह (बीआरआय) अंतर्गत सर्वात महत्त्वपूर्ण योजना पाकिस्तानात होत आहे; पण या देशाकडे दहशतवादाचा निर्यातक म्हणून पाहिले जाते. चीनने असे संकेत दिले आहेत की, जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहर याला जागतिक दहशतवादी घोषित करण्यासाठी चीन स्वत:च्या भूमिकेची समीक्षा करीत आहे. चीनच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते लू कांग यांनी सांगितले की, आम्ही संबंधित पक्षांसोबत संपर्क करून आहोत. मसूद अझहरप्रकरणी आपला दृष्टिकोन बदलण्यापूर्वी चीनला केवळ पाकिस्तान सरकार आणि सैन्य यांनाच नव्हे, तर पाकिस्तानातील जनतेलाही भूमिका समजावून सांगावी लागेल. यातून संघर्ष निर्माण होऊ नये, याचीही काळजी घ्यावी लागेल. (वृत्तसंस्था)