डोकलामप्रश्नी जनरल बिपिन रावत यांच्या वक्तव्यावर चीनने बाळगले मौन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2018 06:21 PM2018-01-09T18:21:15+5:302018-01-09T18:27:17+5:30
भारताचे लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी डोकलामसंबंधी केलेल्या वक्तव्याबाबत चीनने मौन पाळले आहे. मात्र डोकलामध्ये तैनात असलेले त्यांचे सैनिक देशाच्या स्वायत्ततेसंबंधी अधिकारांचा वापर करत आहेत, असे चीनने मंगळवारी सांगितले.
बीजिंग - भारताचे लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी डोकलामसंबंधी केलेल्या वक्तव्याबाबत चीनने मौन पाळले आहे. मात्र डोकलामध्ये तैनात असलेले त्यांचे सैनिक देशाच्या स्वायत्ततेसंबंधी अधिकारांचा वापर करत आहेत, असे चीनने मंगळवारी सांगितले. डोकलाममध्ये चीनी सैनिकांच्या संख्येमध्ये घट झाली आहे, असे वक्तव्य भारताचे लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी केले होते. भारत आणि चीन यांच्यात निर्माण झालेला डोकलाम विवाद 78 दिवस चाललेल्या तणावानंतर 28 ऑगस्ट रोजी संपुष्टात आला होता.
भारताचे लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी डोकलाम संदर्भात केलेल्या वक्तव्याबाबत विचारणा केली असता चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लू कांग म्हणले की, "डोकलामचा भूभाग हा चीनचा भाग आहे. तसेच तो नेहमी चीनच्या अधिपत्याखाली राहिला आहे. तसेच त्याबाबत कोणताही वाद निर्माण झालेला नाही आहे."
चीनी सैनिकांच्या अरुणाचल प्रदेशमधील घुसखोरीचा प्रश्न सोडवण्यात आला आहे, असे लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी सोमवारी सांगितले होते. त्यावेळी डोकलाममधील चिनी सैनिकांच्या उपस्थितीमध्येही घट झाल्याचा दावा बिपिन रावत यांनी केला होता. भारताचे ईशान्येकडील राज्य असलेला अरुणाचल प्रदेश हा आपला भाग असल्याचा दावा चीनकडून नेहमीच करण्यात येतो.
चिनी सैनिकांनी डिसेंबरअखेर रस्ते उभारण्याच्या यंत्रसामुग्रीसह अरुणाचल प्रदेशच्या सियांग जिल्ह्यातील गावापर्यंत मजल मारली होती. तिथे ते रस्ता बांधण्यासाठीचे सामान घेऊन आले होते. मात्र सीमेवर तैनात असलेल्या भारतीय जवानांनी चिनी सैनिकांना वेळीच रोखले. चिनी सैनिकांनी घुसखोरी केल्याच्या वृत्तास सुरक्षा संस्थेतील लोकांनी दुजोरा दिला आहे. जवळपास ८ ते १० दिवसांपूर्वी हा प्रकार घडला. मात्र तो आता उघडकीस आला होता. भारतीय जवानांनी वेळीच त्यांना रोखल्याने चिनी सैनिक सोबत आणलेली यंत्रसामुग्री तेथेच सोडून माघारी फिरले, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले होते
त्याआधी 16 जूनपासून डोकलाममध्ये भारत आणि चीन संघर्षाला सुरुवात झाली होती. 73 दिवस दोन्ही देशांचे सैन्य समोरासमोर होते. भारत, चीन आणि भूतान या तीन देशांच्या सीमा डोकलाममध्ये जिथे मिळतात त्या भागाला ट्राय जंक्शन म्हणतात. चीनने त्या ट्राय जंक्शनजवळ रस्ता बांधणीचे काम सुरु केल्यामुळे संघर्षाला सुरुवात झाली होती. कारण चीनने जर इथे रस्ता बांधला असता तर भारताचा रणनितीक दृष्टया महत्वाचा भूप्रदेश चीनच्या टप्प्यात आला असता.