चीन ‘सर्जिकल स्ट्राइक’च्या तयारीत, चीनी तज्ज्ञांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2017 05:25 AM2017-08-06T05:25:24+5:302017-08-06T06:15:57+5:30
भारतीय सैन्याला डोकलाम भागातून हटविण्यासाठी चीन तिथे छोटे युद्ध पुकारू शकते, असा इशारा चीनमधील तज्ज्ञांनी दिला आहे. सर्जिकल स्ट्राइकप्रमाणे ही कारवाई असेल, असे सांगण्यात येते.
बीजिंग : भारतीय सैन्याला डोकलाम भागातून हटविण्यासाठी चीन तिथे छोटे युद्ध पुकारू शकते, असा इशारा चीनमधील तज्ज्ञांनी दिला आहे. सर्जिकल स्ट्राइकप्रमाणे ही कारवाई असेल, असे सांगण्यात येते. मोदी सरकार देशाला युद्धाच्या खाईत लोटत आहे, असा आरोपही चीनी वृत्तपत्रांनी केला आहे. डोकलाममध्ये चीनने रस्ता बांधण्याचे प्रयत्न केल्यापासून भारतीय सैन्य तिथे आहे. ते हटविण्यासाठी चीनी सैन्य दोन आठवड्यांत कारवाई करू शकते, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. (वृत्तसंस्था)
युद्धाची तयारी सुरू
भारताविरोधात चीन लष्करी आॅपरेशन करू शकते, असे शांघाय अकॅडमी आॅफ सोशल सायन्सेसमधील आंतरराष्ट्रीय विषयांचे संशोधक यांचे म्हणणे आहे. डोकलाममध्ये चीनी लष्कर शस्त्रास्त्रांचा वापरू शकतो,
असे त्यांच्या युद्धाभ्यासावरून स्पष्ट होते. भारताची उक्ती व कृतीमध्ये खूपच अंतर आहे, असे सेंटर फॉर एशिया-पॅसिफिक स्टडी सेंटरचे संचालक जाओ गेनचेंग यांनीही म्हटले आहे.
भारतीय सैन्याला माघार घेण्यास भाग पाडणे वा त्यांना ताब्यात घेणे, हा चीनचा या आॅपरेशनचा हेतू असेल. अशी कारवाई करण्यापूर्वी चीनचे परराष्ट्र मंत्रालय त्याची माहिती भारताला देईल, असे ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे. चीनच्या सरकारी टीव्ही चॅनलने चीनी सैन्याने तिबेटमध्ये युद्धाभ्यास केल्याचे वृत्त दिले आहे. त्या वृत्तानुसार, पहाटे ४ वाजता हा युद्धाभ्यास सुरू झाला होता. शत्रूपक्षाच्या ठिकाणांवर कब्जा करण्यासाठी हा सराव होता, असे टीव्ही चॅनलने म्हटले आहे.