चंद्रावरील अपरिचित ठिकाणी उतरले चीनचे यान; पहिले छायाचित्रही पाठवले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2019 04:23 AM2019-01-04T04:23:50+5:302019-01-04T04:24:29+5:30
चीनचे चांग ई ४ हे यान चंद्राच्या दूरच्या व अपरिचित बाजूला उतरण्यात यशस्वी झाले आहे. चंद्राच्या अपरिचित बाजूला पोहोचणारे जगातील हे पहिले यान ठरले आहे.
बीजिंग : चीनचे चांग ई ४ हे यान चंद्राच्या दूरच्या व अपरिचित बाजूला उतरण्यात यशस्वी झाले आहे. चंद्राच्या अपरिचित बाजूला पोहोचणारे जगातील हे पहिले यान ठरले आहे.
या यशस्वी प्रक्षेपणामुळे जागतिक स्तरावर अंतराळातील महाशक्ती होण्याच्या चीनच्या महत्त्वाकांक्षांना आणखी बळ मिळाले आहे. चीनच्या राष्ट्रीय अंतराळ प्रशासनाने (सीएनएसए) घोषणा केली आहे की, यान ‘चांग ई४’ने चंद्राच्या अपरिचित बाजूची छायाचित्रे पाठविली आहेत. निर्धारित लँडिंगस्थळी हे यान गुरुवारी स्थानिक वेळेनुसार सकाळी १० वाजून २६ मिनिटांनी पोहोचले. ‘चांग ई४’चे प्रक्षेपण शिचांगच्या प्रक्षेपण केंद्रावरून ८ डिसेंबर रोजी लाँग मार्च ३ बी रॉकेटच्या माध्यमातून केले होते. या यानाने मॉनिटर कॅमेऱ्यातून घेतलेले लँडिंग स्थळाचे एक छायाचित्र पाठविले. चंद्राच्या अपरिचित बाजूने घेतलेले हे जगातील पहिले छायाचित्र आहे. हे छायाचित्र सीएनएसएने प्रकाशित केले आहे. (वृत्तसंस्था)
रहस्यमय भागाचा शोध
सरकारी न्यूज एजन्सी शिन्हुआने सांगितले की, ‘चांग ई ४’ मिशन चंद्राच्या रहस्यमयी भागाचा शोध घेण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडेल. चंद्र अभियान ‘चांग ई ४’चे नाव चिनी पौराणिक कथांच्या चंद्रमा देवीच्या नावावर ठेवण्यात आले आहे. ‘चांग ई ४’हे यान दोन मुख्य भागात बनले आहे. मुख्य लँडरचे वजन २४०० पाऊंड आहे आणि रोव्हर ३०० पाऊंडचे आहे. तुलनेत नासाच्या मंगळावरील रोव्हरचे वजन ४०० पाऊंड आहे.