चीनची भिंत आली आडवी
By Admin | Published: June 25, 2016 03:14 AM2016-06-25T03:14:23+5:302016-06-25T03:15:01+5:30
एनएसजीचे (आण्विकपुरवठादार समूह) सदस्यत्व मिळविण्यासाठी भारताने केलेल्या प्रयत्नांना मुख्यत: चीनच्या विरोधामुळे यश आले नाही.
सेऊल : एनएसजीचे (आण्विकपुरवठादार समूह) सदस्यत्व मिळविण्यासाठी भारताने केलेल्या प्रयत्नांना मुख्यत: चीनच्या विरोधामुळे यश आले नाही. चीनने खोडा घातल्याने आणि अन्य काही देश भारताच्या विरोधात गेल्याने भारताच्या महत्त्वाकांक्षांवर पाणी फेरले गेले.
अर्थात, भारताने नाव न घेता यासाठी चीनला जबाबदार ठरविले आहे. एका देशाने सातत्याने अडथळे निर्माण केल्याने हे प्रयत्न यशस्वी
झाले नसल्याचे भारताने म्हटले
आहे. भारतीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ३८ देशांनी भारताला सदस्यत्वासाठी पाठिंबा दिला होता.
एनएसजीच्या ४८ सदस्यीय समूहात सदस्यत्व मिळविण्यासाठी भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर मोर्चेबांधणी केली होती; पण चीनचा विरोध कायम राहिल्याने यात यश मिळू शकले नाही. चीनच्या पाठिंब्यासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी त्या देशाच्या दौऱ्यावर गेले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही चीनच्या राष्ट्रपतींची गुरुवारी ताश्कंदमध्ये भेट घेतली होती. मात्र प्रयत्नांना यश आले नाही आणि चीनची विरोधाची भूमिका कायम राहिली.
एनएसजीच्या गुरुवारी सुरू झालेल्या दोन दिवसीय बैठकीचा येथे शुक्रवारी समारोप झाला. त्यानंतर परराष्ट्र विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी सांगितले की, गुरुवारी रात्री सदस्यत्व व एनपीटीच्या मुद्यावर आम्ही तीन तास चर्चा केली; पण एका देशाने या प्रकरणात अडथळे आणले. (वृत्तसंस्था)
एनएसजीने यासंबंधात स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, भारताच्या बाबतीत कुठलाही ‘अपवाद’ होणार नाही. तथापि, ही चर्चा पुढेही चालू ठेवणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
भारताने एनपीटीवर (अण्वस्त्र प्रसारबंदी करार) स्वाक्षरी केलेली नसल्याने चीन आणि अन्य काही देशांनी भारताच्या सदस्यत्वाला विरोध केला. अर्थात भारताला सदस्यत्व देण्याच्या मुद्द्यावर यापुढेही चर्चा होत राहील.