"मुलं जन्माला घाला आणि भरपूर पैसे कमवा", कंपनीच्या विचित्र ऑफरमुळे खळबळ!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 03:07 PM2024-03-12T15:07:01+5:302024-03-12T15:08:02+5:30
Surrogate Mothers Advertisement : या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश सरकारने दिले आहेत.
"मुलं जन्माला घाला आणि भरपूर पैसे कमवा" अशी विचित्र ऑफर चीनमधील एका कंपनीने महिलांना दिली आहे. यावरून सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, कंपनीने एक ऑनलाइन जाहिरात दिली आहे. ज्यामध्ये 28 ते 42 वर्षे वयोगटातील महिलांना सरोगेट माता बनून लाखो कमावण्याची संधी देण्यात आली आहे. चीनमध्ये सरोगसी बेकायदेशीर असताना अशी परिस्थिती आहे. सरकारने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, चीनच्या हेनान प्रांतातील हुचेन हाउसकीपिंग नावाच्या कंपनीने ही विचित्र जाहिरात दिली आहे. कंपनीच्या जाहिरातीनुसार, ज्यांचे वय 28 वर्षांपेक्षा कमी आहे त्यांना सरोगेट माता बनून 35,000 यूएस डॉलर (म्हणजे 25 लाखांपेक्षा जास्त) कमावण्याची संधी आहे. याचप्रमाणे, कंपनीकडून 29 ते 30 वर्षे वयोगटातील महिलांना 2,10,000 युआन (जवळपास 25 लाख रुपये) देण्यात येतील. तसेच, 40 ते 42 वर्षे वयोगटातील महिलांना या कामासाठी कंपनीने 1,70,000 युआन (20 लाख रुपये) देण्याची ऑफर दिली आहे.
रिपोर्टनुसार, देशात सरोगसी बेकायदेशीर असूनही कंपनी शिनजियांग आणि शांघायमध्ये बिनदिक्कतपणे हा व्यवसाय करत आहे. ग्राहकाच्या इच्छेनुसार, पैसे ठरवले जातात, असे कंपनीने स्थानिक माध्यमांना सांगितले. मात्र, या जाहिरातीमुळे सरकारी अधिकाऱ्यांची झोप उडाली असून तातडीने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
कंपनीने म्हणणे काय?
या ऑफरद्वारे अनेक कुटुंबांना आर्थिक मदत करण्यात येत आहे, असे कंपनीचे म्हणणे आहे. चीनमध्ये सरोगसीवर बंदी असतानाही कायदेशीर त्रुटींचा फायदा घेत कंपनी देशात आपला व्यवसाय चालवत आहे. दुसरीकडे, सोशल मीडियावर जाहिरातींबद्दल लोक विविध चर्चा करत आहेत. यामुळे मानवी तस्करीला चालना मिळणार आहे, असे अनेकांचे मत आहे.