S. Jaishankar In America : अमेरिकेला परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी सुनावलं; चिनी सरकारी वृत्तपत्रानंही केलं कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 10:51 PM2022-04-15T22:51:51+5:302022-04-15T22:55:32+5:30
S. Jaishankar In America : चीनचं सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सनं (Global Times) अमेरिकेवर निशाणा साधलाय. भारत त्यांचं ऐकेल हे स्वप्न पाहणं सोडून द्या असं ग्लोबल टाईम्सनं म्हटलंय.
S. Jaishankar In America : युक्रेन आणि रशियादरम्यान सुरू असलेल्या युद्धामध्ये अमेरिका आणि भारत यांच्यातही काही गोष्टींवरून मतभेद दिसून आले. परंतु दुसरीकडे चीनचं सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सनं (Global Times) गेल्या काही दिवसांत भारताच्या निष्पक्ष भूमिकेचं स्वागत केलं, तर अमेरिकेवरही टीका केली आहे. आता पुन्हा एकदा ग्लोबल टाईम्सनं भारताची बाजू घेत उदयास येणाऱ्या महासत्तांशी कसं वागलं पाहिजे हे आता अमेरिकेनं शिकलं पाहिजे असं म्हटलं.
ग्लोबल टाइम्सची ही टिप्पणी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या विधानाच्या संदर्भात आहे, ज्यात त्यांनी मानवाधिकाराच्या मुद्द्यावर अमेरिकेला चोख प्रत्युत्तर दिलं होतं. "स्वतंत्र भारताला मानवाधिकारावर भाषण देण्याचा अमेरिकेला कोणताही अधिकार नाही. भारताला ग्राहक म्हणून पाहण्याचं स्वप्न अमेरिकेनं बंद करण्याची ही योग्य वेळ आहे. अमेरिकेनं आपली नैतिकता आपल्याकडेच ठेवावी आणि उदयास येणाऱ्या महासत्तांशी नीट वागणं शिकलं पाहिजे," असं ग्लोबल टाईम्सनं ट्वीट करत म्हटलं.
अमेरिका भारत टू प्लस टू चर्चेनंतर दोन्ही देशांच्या पार पडलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत एस जयशंकर आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंक न यांनी भारतातील मानवाधिकारांवर वक्तव्य केलं होतं. त्यांच्या वक्तव्यावर जयशंकर यांनी त्वरित उत्तर दिलं नाही. "भारत देखील अमेरिकेतील मानवाधिकारांच्या उल्लंघनाच्या प्रकरणांवर नजर ठेवून आहे," असं त्यांनी सांगितलं. तसंच बैठकीदरम्यान मानवाधिकारावर कोणतीही चर्चा झाली नाही, जर पुढे असं झालं तर भारत यावर चर्चा करण्यासाठी पूर्णपणे तयार असल्याचंही ते म्हणाले.